राजीनाम्यासाठी उपसरपंचांसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू; सरपंचावर गुन्हा दाखल
By ज्ञानेश्वर भाले | Published: August 7, 2023 04:50 PM2023-08-07T16:50:40+5:302023-08-07T16:51:20+5:30
मारहाणीत गंभीर जखमी युवकाचा उपचारादम्यान मृत्यू; सेलू ठाण्यात सरपंचासह पाच जणांवर गुन्हे दाखल
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (जि.परभणी) : उपसरपंचपदाचा राजीनामा दे या कारणांवरून सरपंचासह इतर जणांनी उपसरपंचासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ब्राम्हणगावात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी युवकाचा उपचारदम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला. निखील रमेश कांबळे असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध सेलू ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गावात पोलीस फौजफाटा तैनात असल्याने तणावपूर्ण शांतता आहे.
ब्राम्हणगावात ५ ऑगस्टला झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या उपसरपंच शशीकलाबाई रमेश कांबळे यांनी परभणी रूग्णालयात उपचारदम्यान दिलेला जाबाब सेलू ठाण्यात रविवारी रात्री उशीरा मिळाला. या फिर्यादीत आरोपी सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पुनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे (सर्व.रा.ब्राम्हणगाव) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचे उपसंरपचपदाचा राजीनामा दे या कारणावरून शिवीगाळ करून फिर्यादीसह तिचा पती व मुलास लाथाबुक्याने मारहाण केली होती.
फिर्यादीचा मोठा मुलगा निखील रमेश कांबळे यास रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याने त्याचा उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाल्याचे फिर्यादीने जबाबात म्हटले आहे. या गुन्ह्याची माहिती पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार आरोपी साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पुनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे यांच्याविरूध्द सेलू ठाण्यात रविवारी मध्यरात्री विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ हे तपास करीत आहे. दरम्यान मयत निखील कांबळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे ब्राम्हणगाव पोलीस फौजफाटा तैनात केलेला आहे.
वादाचे पर्यावसान हाणामारीत
घटनेच्या दिवशी सकाळी नऊला उपसरपंचपदाच्या राजीनाम्यासाठी उपसरपंच कुटुंबातील सदस्यासोबत सरपंचासह कुटुंबातील सदस्यांनी वाद घातला होता. पुढे या वादाचे पर्यावसान त्याच दिवशी शनिवारी सायंकाळी सहाला मारहाणीत झाले. यातून उपचारदम्यान उपसरपंच यांच्या मुलाचा मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्यांच्या गावात फौजफाटा
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेता उपविभागीय अधिकारी अधिकारी सुनिल ओव्हळ ,पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी तातडीने घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. दरम्यान रविवारी रात्री दोनला पोलीस अधीक्षक रागसुधा आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सोमवारी दुपारी बाराला मयत निखील कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.