ताडकळस बाजार समितीकडून प्रमाणित 'माहिती' मिळत नसल्याने संचालकांचे परभणीत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 04:29 PM2018-01-15T16:29:24+5:302018-01-15T16:29:24+5:30
ताडकळस येथील बाजार समितीतून मागितलेल्या माहितीच्या प्रमाणित प्रती मिळत नसल्याने जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समितीच्या सचिवांविरुद्ध येथील संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
परभणी : ताडकळस येथील बाजार समितीतून मागितलेल्या माहितीच्या प्रमाणित प्रती मिळत नसल्याने जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समितीच्या सचिवांविरुद्ध येथील संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
या संदर्भात जिल्हाधिकार्याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संचालक मंडळाच्या मासिक बैठकीच्या प्रोसेडींगच्या प्रमाणित प्रती द्याव्यात, बाजार समितीच्या भूखंडाच्या मूळ आराखड्याची प्रत द्यावी, बाजार समितीकडे असलेल्या एकूण भूखंड व गाळ्यांची संख्या तसेच गाळे वाटप केलेल्या तारखेसह गाळेवाटप धारकांची यादी, लिज मुदत संपलेल्या भूखंडाची यादी आदी माहिती संचालकांनी बाजार समितीच्या सचिवांकडे मागितली होती.
उपोषणाची नोटीस दिल्यानंतर मागील पत्रावर तारीख बदलून अर्धवट माहिती देण्यात आली. त्यामुळे बाजार समितीचे सचिव आणि जिल्हा उपनिबंधक हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारपासून संचालकांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, परिपूर्ण माहिती मिळेपर्यंत उपोषण करण्याचा इशारा संचालकांनी बोलून दाखविला आहे. ताडकळस बाजार समितीचे संचालक दिलीपराव आंबोरे, अंकुश जोगदंड, पांडुरंग पौळ, पंडितराव जाधव, भगगवान सलगर, शिवसेना तालुकाप्रमुख उद्धवराव काळे, सुरेश भालेराव आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला आहे.