पुणे, मुंबईच्या खासगी प्रवासभाड्यात घट तर कोल्हापूर, नागपूरसाठीचे भाडे स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:22 AM2021-08-20T04:22:46+5:302021-08-20T04:22:46+5:30
परभणी : कोराेना संसर्ग घटला तरीही प्रवाशांची संख्या मात्र वाढली नसल्याने यंदा खासगी प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रवाशांअभावी ...
परभणी : कोराेना संसर्ग घटला तरीही प्रवाशांची संख्या मात्र वाढली नसल्याने यंदा खासगी प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रवाशांअभावी खासगी वाहतूकदारांना प्रवासभाडे कमी करावे लागले आहे.
दरवर्षी सणांच्या काळात मोठ्या शहरातील खासगी प्रवासभाडे वाढविले जाते. मात्र या वर्षी उलट परिस्थिती आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडे प्रवाशांची संख्या अजूनही वाढली नाही. अनेक वेळा क्षमतेपेक्षा कमी प्रवाशांसाठीदेखील वाहतूक करावी लागते. त्यामुळे प्रवासभाडे वाढविण्याऐवजी कमी झाले आहे.
ट्रॅव्हल्सची संख्यादेखील घटली
खासगी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय परवडत नसल्याने काही मार्गावरील गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रवास भाड्यात होणारी वाढ यंदा झाली नाही.
परभणी जिल्ह्यातून पूर्वी पुण्यासाठी ४५ ट्रॅव्हल्स धावत होत्या. सध्या ही संख्या ३२ वर आली आहे. मुंबईसाठी ५ ट्रॅव्हल्स होत्या. त्यापैकी एक बंद झाली आहे, तर नागपूरसाठी ९ ट्रॅव्हल्सपैकी सध्या ७ ट्रॅव्हल्स सुरू आहेत.
डिझेल दरवाढीचा फटका
मागील काही महिन्यांपासून डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रवासखर्च वाढला; परंतु, प्रवाशांची संख्या कमी असल्याने दरवाढ केली जात नाही. जास्तीत जास्त प्रवासी मिळविण्यासाठी पूर्वीच्या दरापेक्षा सध्या प्रवास दर कमी आहेत.
- संभानाथ काळे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक