स्वच्छ ‘सेलूकर’ स्पर्धेत महिलांना मिळणार बक्षिसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:14 AM2021-01-04T04:14:44+5:302021-01-04T04:14:44+5:30
सेलू : शहरातील प्रभागनिहाय ज्या महिला आपले घर, अंगण, परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरण ठेवतील त्या घरांची निवड करून ...
सेलू : शहरातील प्रभागनिहाय ज्या महिला आपले घर, अंगण, परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरण ठेवतील त्या घरांची निवड करून त्यांना साहित्य स्वरूपात बक्षिसे देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सेलू पोलिकेने देशपातळीवर आपला ठसा उमटवला आहे. स्वच्छता अभियानात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत शहरातील बारा प्रभागांत स्वच्छ सेलूकर स्पर्धा आयोजित केली आहे. सहभागी घरांनी ओला, सुका कचरा, घरगुती घातक कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत देणे, कचरा संकलन व वर्गीकरण करण्यासाठी बारकोड असणे बंधनकारक आहे. होम कम्पोस्टिंग, पुनर्भरण करणे, प्लास्टिकमुक्त घर आदी बाबींची पाहणी करण्यासाठी समितीकडून प्रति महिना आणि आठवड्याला तपासणी केली जाणार आहे.
प्रथम पारितोषिक फ्रीज नग १२, द्वितीय पारितोषिक वाॅशिंग मशीन नग १२, तृतीय पारितोषिक कूलर नग १२, प्रोत्साहनपर पारितोषिक पैठणी नग १२, डीनरसेट नग १२, कपसेट ६० प्रति प्रभाग ५ असे एकूण ६० साहित्य स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सीसीटीव्हीतून निरीक्षण
स्वच्छ सेलूकर स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर स्पर्धेच्या अटीची पूर्तता होत आहे की नाही, याचे निरीक्षण प्रत्येक घंटागाडीवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे केले जाणार आहे.