कार्यक्रम हळदी कुंकवाचा - जागर मतदानाचा; उच्चशिक्षितांमध्ये कर्तव्याच्या जाणीवेसाठी उपक्रम
By ज्ञानेश्वर भाले | Published: February 9, 2024 01:15 PM2024-02-09T13:15:19+5:302024-02-09T13:15:50+5:30
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून जागर मतदानाचा; परंपरा अन् कर्तव्याची सांगड घालत अनोखा उपक्रम
परभणी : मकर संक्रांतीच्या पारंपारिक उत्सवाला मतदान जागृतीची जोड देत परभणीत "कार्यक्रम हळदी कुंकवाचा - जागर मतदानाचा" हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला.
राष्ट्रीय जबाबदारी आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने संस्कृतीचे जतन करत मतदान करण्याचा संदेश देणारे विविध कल्पक पोस्टर कार्यक्रमास्थळी लावण्यात आले होते. या प्रसंगी पारंपारिक हळदी कुंकवाच्या सजावटीसह प्रारूप मतदान केंद्र स्थापित करून हळदी कुंकवाच्या वाणाची प्रक्रिया निवडणूक मतदान प्रक्रियेद्वारे करण्यात आली.
उच्च शिक्षित समाजातील मतदानाची कमी टक्केवारी कमी आहे. यात प्रामुख्याने महिलांमध्ये मतदानाची अनास्था पाहून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आल्याचे वैशाली पोटेकर यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत मतदान म्हणजे केवळ अधिकार नसून ती जबाबदारी असल्याचा संदेश यातून देण्यात आला. या निमित्ताने उपस्थित ३०० महिलांनी संकल्प करून मतदानाचा निर्धार केला.
मतदानाची सर्वच प्रक्रिया
यात केंद्रातील विविध अधिकारी, मतदार यादीसारखी आमंत्रितांची यादी, क्रमांकानुसार पोलिंग चीट सारखे एक कार्ड, हळदी कुंकू लावण्यासोबत त्यांच्या बोटाला नेल पेंट लावून मतदान झाल्याची खूण करणे, मतदान कक्षासारखा वाण कक्ष, ईव्हीएम बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटची प्रतिकृती यासारख्या अनेक बाबींचे कल्पकतेने कार्यान्वयन करण्यात आले. महिला आकर्षित होईल अशा सुंदर सेल्फी पॉइंटची "संकल्प संक्रांतीचा निर्धार मतदानाचा" अशी टॅग लाईन ठेवण्यात आली.