कार्यक्रम प्रशासनाचा, जुंपली ग्रामस्थांमध्ये; पेडगाव येथील प्रकार
By मारोती जुंबडे | Published: December 17, 2023 06:28 PM2023-12-17T18:28:17+5:302023-12-17T18:28:31+5:30
अधिकारी आल्या पावली परतले
परभणी: विकसित भारत संकल्प यात्रा अभियान अंतर्गत पेडगाव येथे प्रशासनाकडून कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रशासन लवाजम्यासह गावात धडकले. महिलांसह ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने कार्यक्रमास्थळी जमा झाले. मात्र स्थानिक ग्रामस्थांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर धक्काबुकीत झाल्याने गोंधळ वाढला, अखेर हा कार्यक्रम रद्द करून प्रशासन आल्यापावली शहराकडे परतले. त्यामुळे कार्यक्रम प्रशासनाचा अन् जुंपली ग्रामस्थांमध्ये असाच काहीसा प्रकार पेडगाव येथे रविवारी घडला.
विविध योजना अंतर्गत पात्र असलेले परंतु लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे परभणी जिल्ह्यात २४ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जाऊन लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. या अनुषंगाने तालुका प्रशासनाने ही जोरदार तयारी केली आहे. तालुका प्रशासनाच्या वतीने रविवारी सकाळी पेडगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यासाठी केंद्राचे उपसचिव गिरी हे उपस्थित राहणार होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे डॉ. संदीप घोन्सीकर, गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्यासह अधिकारी व कर्मचारी हजर झाले. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. खुर्च्यांसह इतर व्यवस्थाही करण्यात आली काही. हा कार्यक्रम सुरू होणार तेवढ्यात दोन ग्रामस्थांमध्ये सेल्फी पॉईंटवरुन वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. त्यामुळे गोंधळ वाढला. प्रशासनालाही सूचनेना आपण काय करावे, त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करून आल्या पावली प्रशासन माघारी फिरल्याने अखेर हा गोंधळ थांबला.
शनिवारी उमरी तर रविवारी पेडगावात गोंधळ
विकसित भारत संकल्प यात्रा अभियान हा कार्यक्रम गरजू लोकांना लाभ पोहोचण्यासाठी आहे की एका पक्षाचा प्रचार प्रसारासाठी आहे, अशी शंका उपस्थित करत परभणी तालुक्यातील जोडपरळी, पोखर्णी येथे वाद झाला होता. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. परंतु शनिवारी उमरी येथे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यानंतर रविवारी सकाळी पेडगाव येथील कार्यक्रमही गोंधळामुळे प्रशासनाला रद्द करून माघारी फिरावे लागले. त्यामुळे प्रशासन ग्रामस्थांच्या मनामध्ये असलेली शंका का? दूर करत नसेल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या गोंधळाबाबत पंचायत समिती प्रशासनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या.
केंद्रीय उपसचिव गिरी राहणार होते उपस्थित
प्रशासनाने ही या कार्यक्रमासाठी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास आधिकारी,सीडिपीओ यांना कार्यक्रमातील प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करून दिली. त्यानंतर सकाळी ८:३० वाजता पेडगाव येथे उपस्थित राहण्याचे आदेशही दिले. त्या अनुषंगाने गावांमध्येही कार्यक्रमाचे स्टेज उभारून जोरदार तयारी करण्यात आली. प्रत्येक योजनेची आकडेवारी स्व:ता जवळ ठेवण्याची सुचनाही करण्यात आली होती. या कार्यक्रमाला केंद्रीय उपसचिव गिरी यांची उपस्थिती राहणार होती.