पनवेल रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:02+5:302021-06-19T04:13:02+5:30
नांदेड-पनवेल ही रेल्वेगाडी दक्षिण मध्य रेल्वे विभागाने बंद केली आहे. ही रेल्वे पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी प्रवासी महासंघाच्या ...
नांदेड-पनवेल ही रेल्वेगाडी दक्षिण मध्य रेल्वे विभागाने बंद केली आहे. ही रेल्वे पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी प्रवासी महासंघाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी नांदेड येथे दमरेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमधील बंधने शिथिल झाली असतानाही मराठवाड्यातील अनेक रेल्वे गाड्या दमरेने सुरू केल्या नाहीत. विशेषतः पुणे येथे जाण्यासाठी नांदेड-पुणे-पनवेल या रेल्वेगाडीला प्रवाशांची मोठी मागणी आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, अधिकारी आदींना पुणे येथे जाण्यासाठी रेल्वे नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन ही रेल्वे तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर महाव्यवस्थापक मल्ल्या यांनी आठ दिवसांत ही रेल्वे सुरू होईल, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पंढरपूरसाठी नांदेड-पंढरपूर एक्स्प्रेस सुरू करावी, नांदेड - पुणे द्विसप्ताहिक गाडी नियमित करावी, पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात. पूर्णा मार्गे नांदेड-नागपूर तसेच नांदेडहून गोवा, बिकानेर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे सुरू करावी, अशी मागणीही केली. मल्ल्या यांनी या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.