पुरातन मंदिर जीर्णोद्धाराचा प्रस्ताव पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:17 AM2020-12-22T04:17:14+5:302020-12-22T04:17:14+5:30
धारासूर येथे ११ व्या शतकातील हेमाडपंथी गुप्तेश्वराचे मंदिर आहे. चालुक्य काळात या मंदिराचे बांधकाम झाले. मंदिराच्या दगडावरील शिल्प, नक्षीकाम ...
धारासूर येथे ११ व्या शतकातील हेमाडपंथी गुप्तेश्वराचे मंदिर आहे. चालुक्य काळात या मंदिराचे बांधकाम झाले. मंदिराच्या दगडावरील शिल्प, नक्षीकाम कोरीव व अप्रतिम असे आहे. सद्यस्थितीत या मंदिराची दुरवस्था झाली आहे.
महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्र विषयक स्थळे व अण्वेषने अधिनियमानुसार राज्य शासनाने या मंदिरात २४ फेब्रुवारी १९९८ रोजी प्राचीन ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित केले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अप्पर सचिवांनी मंदिराच्या दुरावस्थेची पाहणी करुन जीर्णोद्धारासाठीचा अहवाल मागविला होता. त्यानुसार नांदेड येथील पुरातन विभागाच्या सहाय्यक संचालकांनी धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिरास भेट दिली. मंदिरासह परिसरातील पडझड व भविष्यात होणारी पडझड टाळण्यासाठी आर्थिक तरतूद प्रस्तावित केली. २०१७-१८ या वर्षात या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ४ कोटी ९५ लाख ३८ हजार १३८ रुपयांच्या रक्कमेस मान्यता द्यावी, असा अहवाल पुरातन व वस्तुसंग्राहालय संचालकांकडे पाठविला होता. मात्र या प्रस्तावावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.
पर्यटनमंत्र्यांकडे पाठपुरावा
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या संदर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे. त्यांना निवेदन देण्यात आले असून त्यात धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी केली आहे.