पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ५० लाखांची तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:13 AM2021-07-02T04:13:26+5:302021-07-02T04:13:26+5:30

परभणी : हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या परभणी शहरातील पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० ...

Provide Rs. 50 lakhs for beautification of the statue | पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ५० लाखांची तरतूद करा

पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ५० लाखांची तरतूद करा

Next

परभणी : हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या परभणी शहरातील पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० लाख रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी भारतीय बंजारा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

येथील वसमत रोडवरील वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात गुरुवारी वसंतराव नाईक यांची १०८ वी जयंती साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रमानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात पुतळ्याच्या सुशोभीकरणासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. वसंतराव नाईक यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी १० टक्के रक्कमसुद्धा खर्च झाली नाही. तेव्हा उर्वरित रक्कम परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास देऊन या निधीच्या माध्यमातून वसंतराव नाईक शेती संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण केंद्र स्थापन करावे, वसंतराव नाईक महामंडळाला ५०० कोटी रुपये द्यावेत, दलित वस्तीप्रमाणे तांडा वस्तीलाही निधी द्यावा, भटक्या व विमुक्तांच्या आश्रमशाळा, वसतिगृहांना वाढीव अनुदान द्यावे, मूळ भटक्या व विमुक्त यांना १३ जातींचा समावेश असताना ४ टक्के आरक्षण होते. सध्या ९३ जातींचा समावेश झाला आहे. तेव्हा लोकसंख्येनुसार आरक्षण वाढवून द्यावे, ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह सुरू करावे, भटक्या विमुक्तांसाठी जिल्हा स्तरावर वसंतराव नाईक पुरस्कार देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना देवीदास राठोड, गोपीनाथ राठोड, शिवराम जाधव, कैलास चव्हाण, राजेश जाधव, लक्ष्मण जाधव, अशोक जाधव, कसळसिंग चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, विशाल राठोड, लक्ष्मीकांत राठोड, नामदेव राठोड, केसर जाधव, प्रकाश चव्हाण, अशोक आवडे, मोहन राठोड, गणपत राठोड, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Provide Rs. 50 lakhs for beautification of the statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.