रेकच्या अदलाबदलीने रेल्वेस विलंबाचे ग्रहण; पुणे-नांदेड एक्सप्रेस धावली पाच तास उशिरा
By राजन मगरुळकर | Published: February 29, 2024 03:18 PM2024-02-29T15:18:48+5:302024-02-29T15:20:57+5:30
आज नांदेड-पनवेल सुटणार तीन तास उशिरा
परभणी : दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून धावणाऱ्या नांदेड-पनवेल आणि नांदेड-पुणे या दोन रेल्वेचे रेक एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे एक रेल्वे उशिराने धावली की दुसऱ्या रेल्वेला नांदेड येथून निघण्यास विलंब होतो. हा प्रकार नेहमीचा झाला आहे. त्यामुळे रेकच्या घोळामध्ये प्रवाशांना विलंबाच्या प्रवासाचा त्रास सहन करावा लागत आहे.
नांदेड-पनवेल रेल्वे परभणीमार्गे परळीकडून पुणे, पनवेल धावते तर नांदेड-पुणे रेल्वे परभणी येथून छत्रपती संभाजीनगर, मनमाडमार्गे पुण्यापर्यंत धावते. नांदेड-पुणे ही रेल्वे पुणे स्थानकावरून दिवसभर पुणे ते हरंगुळपर्यंत नेली जाते. त्यानंतर ती परत रात्री हरंगुळ-पुणे अशी आल्यावर पुणे येथून सोडली जाते. पुणे-नांदेड एक्स्प्रेस बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस किमान तीन ते पाच तास उशिराने धावली. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास परभणीत रेल्वे दाखल झाली. त्यामुळे ही रेल्वे नांदेडला नियोजित वेळेपेक्षा सहा तास उशिराने आली. याच रेल्वेचा रेक सायंकाळी नांदेड-पनवेल म्हणून निघतो.
आज नांदेड-पनवेल सुटणार तीन तास उशिरा
नांदेड-पनवेल रेल्वेचा नियोजित वेळ नांदेड येथून सुटण्याचा सहा वाजून वीस मिनिटांचा आहे. ही रेल्वे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता नांदेड येथून सुटणार आहे. त्यामुळे पुढील प्रवासाला ही रेल्वे विलंबाने धावण्याची शक्यता आहे. दर आठवड्यामध्ये या प्रकाराचा नांदेड विभागातील नांदेड, परभणी, पूर्णा, परळी, लातूर रोड मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.