मारहाण प्रकरणी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:36+5:302021-03-07T04:16:36+5:30
सुनील बुक्तरे हे खासगी कामानिमित्त पूर्णा येथे आले असताना आरोपींनी जुन्या वादातून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती. ...
सुनील बुक्तरे हे खासगी कामानिमित्त पूर्णा येथे आले असताना आरोपींनी जुन्या वादातून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती. या प्रकरणी सुनील बुक्तरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अंकित कदम व विष्णू कदम या दोघांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.जी. बागल यांच्या न्यायालयासमोर ४ मार्च रोजी सुनावणी झाली. त्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. बागल यांनी कलम ३२३, ३४ अंतर्गत कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंड सुनावला. त्याचप्रमाणे दंड न भरल्यास सात दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. आनंद गिराम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. मनाळे यांनी काम पाहिले. त्यांना पी. एस. राठोड, प्रमोद सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.