परभणीत मास्क न वापरणाऱ्या १०५ जणांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 08:24 PM2020-07-15T20:24:06+5:302020-07-15T20:25:39+5:30
परजिल्ह्यातून परभणी शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांची पथकामार्फत तपासणी केली जात आहे़
परभणी : येथे महानगरपालिकेच्या पथकाने मंगळवारी सोशल डिस्टन्स व मास्कच्या नियमांचे पालन न करणाऱ्या १०५ नागरिकांवर प्रत्येकी २०० रूपये या प्रमाणे दंडात्मक कारवाई केली आहे़
शहरातील प्रभाग समिती क अंतर्गत वसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालयासमोर आणि पाथरी रस्त्यावर पथकाने ही कारवाई केली़ पाथरी रोड भागात ग्रामीण पोलीस ठाण्याचे गाडेकर, मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, राजू झोडपे, भीमराव लहाणे, प्रकाश काकडे यांनीही कारवाई केली़ शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, महापालिकेचे सहायक आयुक्त सुधाकर किंगरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली़ संचारबंदी लागू असतानाही नागरिक घराबाहेर पडत असून, मास्कचा वापर करीत नाहीत़ फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात नाही़ याविरूद्ध मनपाच्या पथकाने कारवाई करून २१ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे़
वालूरमध्ये ९ जणांवर कारवाई
वालूर : वालूर गावात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतरही ग्रामस्थ रस्त्यावर फिरत असून, मास्कचा वापर न करणाऱ्या ९ जणांवर मंगळवारी कारवाई करून त्यांच्याकडून १ हजार ८०० रूपये दंड वसूल केला आहे़ वालूर येथे कोरोनारूग्ण आढळले असून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने हा परिसर सील केला आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केल्यानंतरही काही ग्रामस्थ मास्कचा वापर न करता गावात फिरत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर पथकाने कारवाई सुरू केली़ नऊ जणांकडून १ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ ही कारवाई जमादार संजय साळवे, पोलीस नाईक सईद रहीम, आऱएस़ जारवाल, ग्रां.प. कर्मचारी काशीनाथ जिवणे, महेमूद पठाण, ऋषी वाघमारे, प्रदीप सोनवणे, शेवाळे आदींनी केली़
तिन्ही रस्त्यांवर तपासणी
परजिल्ह्यातून परभणी शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांची पथकामार्फत तपासणी केली जात आहे़ परभणी योद्धा म्हणून नियुक्त केलेले स्वयंसेवक, बापू सेवाभावी संस्थेचे सदस्य तसेच प्रभाग समितीचे कर्मचारी ही तपासणी करीत आहेत़ थर्मल गनच्या सहाय्याने तापीची नोंद घेतली जात असून, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना दंड लावला जात आहे़ मंगळवारी मनपाने या तिन्ही रस्त्यावर तपासणी केली जात आहे़ दरम्यान, नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन देविदास पवार यांनी केले आहे़