जिल्ह्यातील सात हमीभाव केंद्रांवर २०८४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:35+5:302021-03-20T04:16:35+5:30

परभणी : जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रांवर हमीभाव दराने हरभऱ्याची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ५ हजार ६५० शेतकऱ्यांनी ऑनलाईन ...

Purchase of 2084 quintals of gram at seven guarantee centers in the district | जिल्ह्यातील सात हमीभाव केंद्रांवर २०८४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी

जिल्ह्यातील सात हमीभाव केंद्रांवर २०८४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी

Next

परभणी : जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रांवर हमीभाव दराने हरभऱ्याची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ५ हजार ६५० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २०८ शेतकऱ्यांकडून २ हजार ८४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे.

खरीप हंगामातील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कापूस उपटून त्याजागी हरभऱ्याचे पीक घेतले. जिल्ह्यात यावर्षी कृषी विभागाच्या अहवालानुसार १८४ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली होती. सध्या हरभऱ्याची काढणी पूर्ण झाल्यानंतर हा हरभरा शेतकरी विक्रीसाठी खासगी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नेत होता. या संधीचा फायदा घेत खासगी व्यापाऱ्यांनी कवडीमोल दराने हरभऱ्याची खरेदी केली. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट को-ऑप.च्यावतीने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, बोरी, पाथरी, पूर्णा व सोनपेठ या सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रांवर ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दराने हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ५ हजार ६५० शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. यातील १ हजार ११२ शेतकऱ्यांना जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून हरभरा विक्रीला आणण्यासाठी मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २०८ शेतकऱ्यांनी आतापर्यंत २ हजार ८४ क्विंटल हरभऱ्याची विक्री या हमीभाव खरेदी केंद्रांकडे केली आहे.

यामध्ये परभणी येथील केंद्रावर ७७ शेतकऱ्यांनी ८८२ क्विंटल ५० किलो, बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर २७ शेतकऱ्यांनी २५७ क्विंटल, पाथरी येथे ८५ शेतकऱ्यांनी ७४९ क्विंटल, पूर्णा येथील हमीभाव केंद्रावर १९ शेतकऱ्यांनी १९५ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची ५ हजार १०० रुपये दराने विक्री केली आहे.

तीन केंद्रांवर खरेदीच नाही

जिल्ह्यात ७ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले असले तरी या केंद्रांना शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. जिंतूर, सेलू व सोनपेठ या हमीभाव खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी आणण्यासाठी मोबाईलवर एसएमएस पाठवले आहेत. मात्र, १८ मार्चपर्यंत एकाही शेतकऱ्याने आपला हरभरा विक्रीसाठी आणला नाही. खासगी बाजारपेठेत हरभऱ्याचे वाढलेले दर यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Purchase of 2084 quintals of gram at seven guarantee centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.