परभणी जिल्ह्यात ३ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 06:59 PM2018-04-26T18:59:10+5:302018-04-26T18:59:10+5:30

जिल्ह्यामध्ये नाफेडकडून ७ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ त्यापैकी ५ हमीभाव खरेदी केंद्रावर १५ ते २४ एप्रिल दरम्यान ३ हजार १५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे़

Purchase of 3 thousand quintals of turf in Parbhani district | परभणी जिल्ह्यात ३ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी

परभणी जिल्ह्यात ३ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी

Next

परभणी : जिल्ह्यामध्ये नाफेडकडून ७ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ त्यापैकी ५ हमीभाव खरेदी केंद्रावर १५ ते २४ एप्रिल दरम्यान ३ हजार १५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे़ दरम्यान, अनेक तूर उत्पादकांच्या तुरीची खरेदी शिल्लक असल्याने खरेदीसाठी १५ मेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी पारंपरिक ज्वारी पिकास फाटा देत हरभऱ्याची विक्रमी पेरणी केली़ कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार तब्बल १५० टक्के हरभऱ्याची पेरणी झाली़ कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्नही मिळाले़ 
मात्र शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर व्यापाऱ्यांनी कवडीमोल दराने हरभऱ्याची खरेदी केली़ त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आला़ संघटना व शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर नाफेडने सात हमीभाव खरेदी केंद्रावर १५ एप्रिलपासून ४ हजार ४०० रुपये प्रतिक्ंिटल हमीभाव दराने खरेदीला सुरुवात झाली़ 

परभणी जिल्ह्यातील ७ पैकी ५ हमीभाव खरेदी केंद्रावर अवघ्या ११ दिवसांत ३ हजार १५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली़ परभणी येथील हमीभाव खरेदी  केंद्रावर ६९ शेतकऱ्यांचे १ हजार ६६ क्विंटल ५० किलो, सेलू येथील केंद्रावर २९ शेतकऱ्यांचे ३७७ क्विंटल, जिंतूर येथे २३ शेतकऱ्यांचा २९९ क्विंटल हरभरा, पूर्णा येथील १६ शेतकऱ्यांचा २०६ क्विंटल तर पाथरी येथील हमीभाव खरेदी केंद्रवर ९३ शेतकऱ्यांचा १ हजार २०५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे़ नाफेडने सुरू केलेल्या ७ पैकी गंगाखेड व जिंतूर तालुक्यातील बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही हरभरा खरेदीचा मुहूर्तच मिळाला नसल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे ५ हमीभाव खरेदी केंद्रावर २३० शेतकऱ्यांचे ३ हजार १५३ क्विंंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे़. जिल्ह्यातील २५०० हरभरा उत्पादकांनी आपला शेतमाल विक्रीसाठी हमीभाव खरेदी  केंद्राकडे नोंदणी केली आहे़ त्यातील २३० शेतकऱ्यांच्या शेतमालाची ११ दिवसांमध्ये खरेदी करण्यात आली़ मात्र अजूनही २ हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्याचे आव्हान हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ मेपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाला काट्यांची संख्या वाढवून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करावा लागणार आहे़ 

तुरी खरेदीला २० दिवसांची मुदतवाढ
खाजगी बाजारपेठेत तूर उत्पादकांची अडवणूक होत असल्याने राज्य शासनाने सुरू केलेल्या नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्राकडे जिल्ह्यातील १७ हजार ३६५ तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती़ मात्र राज्य शासनाने १८ एप्रिलपर्यंतच तूर खरेदी करण्याचे आदेश दिले होते़ जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रावर १८ एप्रिलपर्यंत ३ हजार ३२१ शेतकऱ्यांचीच ५५ हजार ४२१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली़ उर्वरित १४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही मुदत संपल्याने त्यांची तूर खरेदी करण्यात आली नाही़

तूर-हरभरा खरेदीचे आव्हान
तुरीसह हरभऱ्याच्या खरेदीसाठी १५ मेपर्यंतची मुदत देण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी खरेदीसाठी असलेला  अल्प कालावधी आणि शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता या काळात तूर आणि हरभऱ्याची संपूर्ण खरेदी होण्याची शक्यता कमी आहे़ 
सद्यस्थितीत प्रतिदिन ५० शेतकऱ्यांचाच शेतीमाल एका केंद्रावर खरेदी होत आहे़ शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र हजारांमध्ये आहे़ त्यामुळे दोन्ही शेतमालांची खरेदी करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार असून, एकाही शेतकऱ्याचा शेतमाल शिल्लक राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे़ जिल्ह्यातील परभणी, सेलू, गंगाखेड, जिंतूर, पूर्णा, पाथरी व बोरी या सात हमीभाव खरेदी केंद्रावर १४ हजार शेतकऱ्यांची  तूर खरेदी करणे बाकी आहे़ तसेच २ हजार २०० शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावयाचा आहे़ मागचा खरेदीचा वेग पाहता शासनाने दिलेल्या १५ मेपर्यंतच्या मुदतीत तब्बल १६ हजार शेतकऱ्यांची तूर व हरभरा खरेदीचे मोठे आव्हान केंद्र प्रशासनासमोर आहे़ 

Web Title: Purchase of 3 thousand quintals of turf in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.