दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:13 AM2020-12-27T04:13:02+5:302020-12-27T04:13:02+5:30

परभणी : जिल्ह्यातील कापूस हंगाम सुरू झाला असून, महाराष्ट्र कापूस फेडरेशनने तीन तालुक्यांत सुरू केलेल्या केंद्रांवर २४ दिवसांत ६ ...

Purchase of two lakh quintals of cotton | दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी

दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी

Next

परभणी : जिल्ह्यातील कापूस हंगाम सुरू झाला असून, महाराष्ट्र कापूस फेडरेशनने तीन तालुक्यांत सुरू केलेल्या केंद्रांवर २४ दिवसांत ६ हजार ४३१ शेतकऱ्यांचा १ लाख ९७ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने नगदी पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. अतिवृष्टीच्या तडाख्यातून बचावलेल्या कापसाची वेचणी करण्यात आली. अनेक भागांत पहिल्याच वेचणीत कापसाचा झाडा झाल्याच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेत पुन्हा फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र कापूस फेडरेशनने ३ डिसेंबरपासून जिल्ह्यात कापूस खरेदी करण्यास प्रारंभ केला आहे. बाजार समितीच्या माध्यमातून ही खरेदी केली जात आहे. कापूस खरेदी करताना गोंधळ होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना मोबाइलवर संदेश पाठविल्यानंतरच कापूस खरेदी केली जात आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्रावरील वाहनांची गर्दीही नियंत्रणात आली आहे.

३ डिसेंबरपासून जिल्ह्यात प्रत्यक्ष कापूस खरेदी सुरू करण्यात आली. परभणी, गंगाखेड आणि पाथरी या तीन केंद्रांवर आतापर्यंत १ लाख ९७ हजार ८०० क्विंटल कापूस खरेदी झाला आहे, अशी माहिती फेडरेशनच्या वतीने देण्यात आली.

केंद्रांची संख्या आणखी वाढवणार

जिल्ह्यात सध्या तीन केंद्रांवरच कापूस खरेदी केला जात आहे. उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन सोमवारपासून सोनपेठ तालुक्यातील करम येथील कापूस खरेदी केंद्रावर खरेदी सुरू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवारपासून गंगाखेड येथे आणखी दोन केंद्र सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे कापूस खरेदी आणखी वेगाने होईल, असे कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक ए.डी. रेणके यांनी सांगितले.

११२ कोटींचा कापूस खरेदी

जिल्ह्यात आतापर्यंत कापूस फेडरेशनने सुमारे २ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. खरेदी केलेल्या कापसाला प्रति क्विंटल ५७०० रुपये भाव दिला जात आहे. याप्रमाणे एकूण ११२ कोटी ७४ लाख ६० हजार रुपयांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे.

खरेदीसाठी वाढविणार शेतकऱ्यांची संख्या

सध्या तीन केंद्रांवर ८५० शेतकऱ्यांना कापूस घालण्यासाठी एस.एम.एस.द्वारे बोलावले जात आहे. दिवसभरात या उत्पादकांचा कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे एकही वाहन केंद्रावर मुक्कामी थांबत नाही. सोमवारपासून दररोज १ हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाणार असून, मंगळवारपासून ही संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे.

-ए.डी. रेणके,

प्रभारी व्यवस्थाक, कापूस पणन महासंघ

Web Title: Purchase of two lakh quintals of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.