पूर्णेचा जॅकवेल पंप दुरुस्तीसाठी औरंगाबादला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:41+5:302020-12-07T04:11:41+5:30
पूर्णा: पूर्णा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा पंप दुरुस्तीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे ...
पूर्णा: पूर्णा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा पंप दुरुस्तीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे हा पंप दुरुस्त होऊन येईपर्यंत पूर्णेकरांना पाणीटंचाईस तोंड द्यावे लागणार आहे.
शहरालगत असलेल्या पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यातून पूर्णा शहराला पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करण्यासाठी नदीवर दोन जॅकवेल पंप आहेत. त्यापैकी एक पंप हा मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. सुरु असलेल्या एका पंपावरुन शहराच्या दोन्ही भागात पाणीपुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलमध्ये ७५ अश्वशक्ती असलेल्या मोटारीच्या फुटबॉल असेंब्लीमध्ये बिघाड झाला होता. कर्मचाऱ्यांनी तो बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला; परंतु, दुरुस्त होत नसल्याने तो पंप औरंगाबाद येथे पाठविण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे मागील आठवडाभरापासून शहरातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाणीपुरवठा पुढील १० दिवस बंद राहणार असल्याचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील अनेक वस्त्यांमध्ये हातपंप नाहीत, अशा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी एमआयएमचे हबीब बागवान यांनी केली आहे.