चंदन तस्करांची ‘पुष्पा’ गँग अडकली; मानवतमध्ये २६१ किलो चंदनासह १० तस्कर अटकेत
By मारोती जुंबडे | Published: June 2, 2023 05:58 PM2023-06-02T17:58:46+5:302023-06-02T17:59:11+5:30
वन विभाग, पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक सोनूला शिवारात माहिती मिळालेल्या ठिकाणी धडकले
मानवत: तालुक्यातील आंबेगाव व सोनूळा शिवारात चंदनाचे झाडे तोडून नेणाऱ्या १० चंदन तस्करांना वनविभाग व मानवत पोलीसच्या पथकाने १ जून रोजी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेच्या दरम्यान संयुक्त कारवाई करून अटक केली. या चंदन तस्कराकडून अंदाजे २६१ किलो चंदन, ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
मानवत तालुक्यातील आंबेगाव, सोनूळा शिवारात गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका नाल्यातील चंदनाची झाडे काही इसम तोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांना देण्यात आली. त्यांनी वन विभागाला कळवून संयुक्त कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
विभागीय वन आधिकारी अरविंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ ऋषिकेश चव्हाण, प्रकाश शिंदे, एस. के. भंडारे,सिमा राठोड, रेखा भेंडेकर, आश्विनी नागठाणे यांचे पथक दाखल झाल्यानंतर सपोनि आनंद बनसोडे, पोउनि किशोर गांवडे, अतुल पंचांगे, पोलीस शिपाई बाबासाहेब भांबट, चालक राजू इंगळे, सिद्धेश्वर पाळवदे, विलास मोरे यांच्या पथकाने आंबेगाव रस्त्यावर सापळा रचून माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या चंदनाचे लाकुड, कुऱ्हाडी, दोन दुचाकी मिळुन आले. या चौघांची चौकशी केली असता त्यांचे साथीदार हे तालुक्यातील सोनूळा शिवारातील शेतकरी आसाराम भोरकडे यांच्या शेतातील आखाड्यावर असल्याची माहिती दिली.
वन विभाग, पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक सोनूला शिवारात माहिती मिळालेल्या ठिकाणी धडकले असता या ठिकाणी चंदणाच्या झाडाच लगदा, कुऱ्हाडी, वाकस, विक्क, वजन काटे, तरा मापे, एक इलेक्ट्रीक काटा, दुचाकी मिळून आली. ही कारवाई ६ तास सुरु होती. वन विभागाच्या पथकाने पंचनामा करुन या दोन्ही ठिकाणच्या मिळून १० जणांना अटक केली असून वन विभागाकडे या आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.