धावत्या कारमध्ये मिरची पूड टाकून दोघांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:48 PM2019-06-27T12:48:58+5:302019-06-27T12:50:25+5:30
दुचाकीस्वारांनी कारमधील दोघांना बेदम मारहाण सुद्धा केली
पाथरी (परभणी ) : दुचाकीवरील चोरट्यांनी धावत्या कारचा पाठलाग करून त्यातील दोघांवर मिरची पूड टाकत लुटल्याची घटना बुधवारी रात्री (दि. २७ ) घडली. यावेळी गंभीर जखमींवर मानवत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बालासाहेब लिंबाजी दळवे (रा. लिंबा ता पाथरी ) आणि उत्तम लक्ष्मण मुळे (रा. नौकोटा ता सोनपेठ ) हे दोघेजण बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान कारमधून सोनपेठ येथून लिंबा गावाकडे निघाले होते. विटा (बु) गाव ओलांडताच दोन दुचाकीवरील चार जणांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. अचानक त्यांनी दुचाकी वेगाने कारच्या पुढे नेत दळवे आणि मुळे यांच्या अंगावर मिरची पूड फेकली. मिरची पूड डोळ्यात गेल्याने चालक उत्तम मुळे यांनी गाडी कशीबशी थांबवली. याचवेळी दुचाकीवरील चोघांनी कारवर दगडफेक केली. नंतर चोघांनी दळवे आणि मुळे यांना कारमधून बाहेर काढत त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या जवळील मोबाईल, अंगावरील दागिने काढून घेतले. या दरम्यान, पाठीमागून एक ट्रक येत असल्याचे चोरांच्या लक्षात येताच त्यांनी तेथून पोबारा केला.
यानंतर मुळे आणि दळवे यांना ट्रॅक चालकाने लिंबा येथे सोडले. येथून खाजगी वाहनाने त्यांनी पाथरी पोलिस ठाणे गाठून चोरीची माहिती दिली. त्यांच्यावर मानवत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.