अर्धवट कामासाठी कंत्राटदाराला दिले सव्वा कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:52+5:302021-06-19T04:12:52+5:30
परभणी : शहरातील विद्या नगर भागातील शिवाजी उद्यानाच्या (नाना-नानी) सुशोभीकरणाचे काम तब्बल साडेतीन वर्षांपासून रेंगाळले असून, केवळ १५ टक्के ...
परभणी : शहरातील विद्या नगर भागातील शिवाजी उद्यानाच्या (नाना-नानी) सुशोभीकरणाचे काम तब्बल साडेतीन वर्षांपासून रेंगाळले असून, केवळ १५ टक्के काम झाले असताना संबंधित कंत्राटदाराला १ कोटी १७ लाख रुपयांचे बिल महानगरपालिकेने अदा केल्याचा प्रकार समोर आला आहे. कंत्राटदारावर दाखविलेली ही मेहरबानी चर्चेचा विषय झाली आहे.
परभणी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विद्यानगर भागात श्री शिवाजी उद्यानाचे सुशोभीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी २०१५-१६ मध्ये ४ कोटी ३३ लाख १३ हजार ४६८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या कामाची निविदा औरंगाबाद येथील ए.एस. कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला सुटली. सदरील काम १२ महिन्यांत पूर्ण करण्याचे तसेच ५ वर्षांपर्यंत या उद्यानाची देखभाल-दुरुस्ती करण्याचा करार निविदेत करण्यात आला होता. त्यामुळे या उद्यानाचे काम वेगाने सुरू होऊन गावठाण भागातील परभणीकरांना चांगले उद्यान उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, महानगरपालिकेतील राजकीय नेते मंडळींच्या कचखाऊ भूमिकेमुळे गेल्या साडेतीन वर्षांपासून या उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. २०१८ मध्ये उद्यानातील जॉगिंग ट्रॅकचे काम करण्यात आले होते. परंतु, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा जॉगिंग ट्रॅक तुटला. त्यानंतर आता दुसऱ्यांदा जॉगिंग ट्रॅक तयार केला जात आहे. याशिवाय येथे कॅन्टीनची खोली तयार करण्यात आली असून, दोन स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. उर्वरित जागेवर काहीही काम केलेले नाही. तरीही महानगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराला तब्बल १ कोटी १७ लाख रुपयांची रक्कम आतापर्यंत अदा केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजकीय हस्तक्षेपातून कंत्राटदारावर ही मेहरबानी दाखविली असताना अधिकारी मात्र बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहेत. महानगरपालिकेत विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्याने सत्ताधारी मंडळींना याचा जाब कोणीही विचारत नाही. परिणामी, मनपात कंत्राटदाराचीच चलती दिसून येत आहे.
६४ लाखांची किंमत वाढली
या कामाची प्रारंभी ४ कोटी ३३ लाख १३ हजार ४६८ रुपये किंमत होती. काम वेळेत झाले नसल्याने नेहमीप्रमाणे या कामाची किंमत वाढविण्यात आली आहे. त्यामध्ये ६४ लाख ५६ हजार ५६६ रुपयांची वाढ करून हे काम आता ४ कोटी ९७ लाख ७० हजार ३४ रुपयांचे झाले आहे. या कामाच्या किंमत वाढीस मनपाने मंजुरीही दिली आहे.
असे होणार आहे उद्यान
जॉगिंग पार्क (४६ लाख ९६ हजार १३३ रुपयांचा खर्च), पार्किंगसाठी जागा (३० लाख खर्च), कॅन्टीन (१८ लाख ८७ हजार ५६९), सुरक्षा रक्षक केबिन (१७ लाख ५० हजार १६८ रुपये), कारंजे उभारणी (१६ लाख २४ हजार ८३० रुपये), प्रवेशद्वार उभारणी (२८ लाख ७९ हजार ७४५ रुपये), प्रवेशद्वारावर ॲल्युमिनियम दरवाजे बसविणे (६ लाख), प्रेक्षागृह (२० लाख २१ हजार ९५३ रुपये), योगासन स्थळ (८ लाख ७१ हजार), लहान मुलांसाठी खेळणी साहित्य (८१ लाख ९८ हजार २५४ रुपये), हॉर्टीकल्चर वर्क (७९ लाख ५२ हजार), साईन बोर्ड (५ लाख ८९ हजार) आदी बाबी या ठिकाणी निधी खर्चून तयार करणे प्रस्तावित आहे.
उद्यानाच्या बाजूला मनपाचे दोन जलकुंभ उभारण्याचे काम आतापर्यंत सुरू होते. या कामाकरिता लागणारे साहित्य घेऊन तेथून वाहने ये-जा करीत होती. त्यामुळेच कामाला उशीर झाला आहे. कंत्राटदाराला काही बिल दिले आहे. कॅन्टीन, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते आदींची कामे झाली आहेत. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
- देविदास पवार, मनपा आयुक्त