स्मशानभूमीचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या दरबारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:02 AM2021-02-05T06:02:31+5:302021-02-05T06:02:31+5:30
परभणी : येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीच्या दुरवस्थेचा प्रश्न थेट पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे मांडण्यात आला आहे. या स्मशानभूमीसाठी सुविधा ...
परभणी : येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीच्या दुरवस्थेचा प्रश्न थेट पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे मांडण्यात आला आहे. या स्मशानभूमीसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र वीरशैव सभेने केली आहे. खंडोबा बाजार भागातील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत अनेक समस्या असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. यासंदर्भात विविध माध्यमांतून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे वीरशैव सभेच्यावतीने पालकमंत्री नवाब मलिक यांनाच या प्रश्नासाठी साकडे घालण्यात आले. स्मशानभूमी परिसरात सांडपाणी साचत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. येथील मोकळ्या जागेत अनेकजण गैरकृत्य करतात. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत प्रतीक्षागृह उभारावे, याठिकाणी दोन स्मशानभूमी असून, दोन्ही बाजूंनी रस्ता करून द्यावा, प्रवेशद्वाराचे ‘वीरशैव लिंगायत स्मशानभूमी’ असे नामकरण करावे, अंत्यविधीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या भागात हायमास्ट दिवे, पाण्याची व्यवस्था करावी, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे त्याचे डांबरीकरण करावे, स्मशानभूमीला संरक्षक भिंत बांधून सुशोभिकरण करावे, आदी मागण्या वीरशैव सभेने केल्या आहेत. वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगअप्पा खापरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी यासाठी पालकमंत्री मलिक यांनाच आता साकडे घातले आहे.