परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:18 AM2019-06-29T00:18:45+5:302019-06-29T00:19:37+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न रखडल्याने या प्रश्नी आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत तारांकीत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न रखडल्याने या प्रश्नी आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत तारांकीत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे़
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विविध राजकीय पक्ष, नेते व जनतेने आंदोलन उभारल्यानंतर याची दखल घेऊन शासनाने भौतिक सुविधा व इतर बाबींच्या पाहणीसाठी त्रिस्तरीय समितीची नेमणूक केली होती़ त्यानंतर या प्रकरणी मंत्री मंडळाच्या बैठकीत घोषणा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते़ त्यावर आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित करून त्यात सदर त्रिस्तरीय समितीने भौतिक सुविधा व इतर बाबींचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश दिले होते का? असल्यास वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला का? वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसंदर्भात कोणती कारवाई केली? आदी प्रश्न उपस्थित केले होते़ त्यावर आरोग्यमंत्री गिरीष महाजन यांनी तारांकीत प्रश्नाला उत्तर दिले आहे़ त्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या २५ सप्टेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार त्रिस्तरीय समिती गठीत केली होती़ या समितीने प्राथमिक अहवाल संचालनालयामार्फत शासनाला सादर केला असून, शासनस्तरावर कारवाई सुरू असल्याचे म्हटले आहे़ तर मंत्री मंडळ बैठकीत निर्णय अणि महाविद्यालयाच्या स्थापनेबाबत सुरू असलेल्या कारवाई संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री मंडळ बैठकीत निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले़ त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न रखडला आहे़