पंचनामा करताना ग्रामसेवकाकडून महिलेस जातीयवाचक शिवीगाळ; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 07:30 PM2021-09-03T19:30:14+5:302021-09-03T19:31:40+5:30
परिसरात 130 मिमी पाऊस पडल्याने पुराचे पाणी हादगाव बुद्रुक गावात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
पाथरी : अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरून झालेल्या नूकसानीचा पंचनामा करत असताना ग्रामसेवकाने दोन हजार रुपयांची मागणी करत जातीयवाचक शिविगाळ केल्याची तक्रार एका महिलेने दिल्यानंतर गुरुवारी रात्री 11.45 वाजता ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक सप्टेंबर रोजी हदगाव बुद्रुक गावात पंचनामा करत असताना ही घटना घडली.
पाथरी तालुक्यात मंगळवारी पहाटे मुसळधार पाऊस पडला. परिसरात 130 मिमी पाऊस पडल्याने पुराचे पाणी हादगाव बुद्रुक गावात शिरले. त्यामुळे येथील इंदिरानगर वसाहतीतील जवळपास दोनशे घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले अतिवृष्टी झाल्यानंतर तहसीलदारांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 1 सप्टेंबरपासून मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्याकडून हादगाव बुद्रुक येथे नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली.
पंचनामा करताना ग्रामसेवक कुलदिप फंड याने सीताबाई मारोती लालझरे या महिलेस 2000 रुपयांची मागणी केली. एवढ्यावर न थांबता फंड याने महिलेस जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत महिलेने पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून ग्रामसेवक कुलदिप फंड याच्या विरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात 2 सप्टेंबर रोजी रात्री 11.45 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त करत आहेत.