औरंगाबाद-पाथरी बसमध्ये दोन महिलांचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:15+5:302021-06-20T04:14:15+5:30
देवगावफाटा : बसप्रवासात उलटी झाल्याने उडालेल्या शिंतोड्यावरून दोन महिला प्रवाशांमध्ये धावत्या बसमध्ये चांगलीच जुंपली. या भांडणादरम्यान एका महिलेने बससमोर ...
देवगावफाटा : बसप्रवासात उलटी झाल्याने उडालेल्या शिंतोड्यावरून दोन महिला प्रवाशांमध्ये धावत्या बसमध्ये चांगलीच जुंपली. या भांडणादरम्यान एका महिलेने बससमोर आडवे येत अर्धा तास बस रोखून धरल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी सेलू पोलिसांनी दोन्ही महिला प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा सर्व प्रकार १९ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता औरंगाबाद- पाथरी या बसमध्ये घडला.
औरंगाबादहून पाथरीकडे (एम.एच.२०/२३१६) या बसमध्ये एक महिला औरंगाबाद येथून तर दुसरी जालना येथून प्रवासाला निघाली. बस प्रवासादरम्यान, एका महिलेस उलट्या झाल्या. या उलटीचे शिंतोडे उडण्याच्या कारणावरून या दोघींमध्ये वाद सुरू झाला. हा प्रकार सेलू तालुक्यातील मोरेगावजवळ घडला. हे भांडण एवढे वाढले की दोघींनी धावत्या बसमध्येच एकमेकींना धक्काबुक्की केली. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. याच गोंधळात ही बस सेलू बसस्थानकावर पोहोचल्यानंतर यापैकी एका महिलेने अर्धा तास बस अडवून धरली. या प्रकाराची माहिती पोलिसांना समजताच सहायक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौरे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह बसस्थानकावर दाखल झाले. त्यांनी दोन्ही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही बस पाथरीकडे रवाना झाली.