रागसुधा आर. यांची बदली, रवींद्रसिंग परदेशी परभणीचे नवे एसपी
By ज्ञानेश्वर भाले | Updated: February 1, 2024 15:18 IST2024-02-01T15:18:08+5:302024-02-01T15:18:33+5:30
पोलिस अधीक्षक रागसुधा आर. या परभणीत २१ ऑक्टोबर २०२२ मध्ये रुजू झाल्या होत्या.

रागसुधा आर. यांची बदली, रवींद्रसिंग परदेशी परभणीचे नवे एसपी
परभणी : राज्यातील भारतीय पोलिस सेवा, राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या गृह विभागाने बुधवारी बदल्या केल्या. यामध्ये परभणीच्या पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांची मुंबई बृहन्मुंबईला पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हे आता परभणीच्या एसपी पदाचा पदभार घेणार आहेत.
पोलिस अधीक्षक रागसुधा आर. या परभणीत २१ ऑक्टोबर २०२२ मध्ये रुजू झाल्या होत्या. यानंतर त्यांनी सुमारे पंधरा महिन्यांच्या कालावधीत जिल्हा पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर बदल केले. सोबतच विविध गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करत आंध्रप्रदेश, विजयवाडा भागातून अपहृत बालकांची सुटका आणि बोगस प्रकल्पग्रस्त बनावट प्रमाणपत्र सादर केल्याच्या प्रकरणात गुन्हे नोंद केले.
आता पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांची बदली बृहन्मुंबई येथे पोलिस उपायुक्त म्हणून झाली आहे. त्यांच्या जागेवर चंद्रपूर येथील पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हे दाखल होणार आहेत. दरम्यान, परदेशी हे यापूर्वी जिल्ह्यात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत होते.