जुगार अड्ड्यावरील छाप्यात साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 07:07 PM2020-12-08T19:07:47+5:302020-12-08T19:08:57+5:30
६ डिसेंबर रोजी पथकातील कर्मचाऱ्यांनी रामेटाकळी गाठून त्या ठिकाणी छापा टाकला.
परभणी : मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाईत रोख ३९ हजार ७२० रुपयांसह १२ लाख ४९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रामेटाकळी परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाल्यानंतर ६ डिसेंबर रोजी पथकातील कर्मचाऱ्यांनी रामेटाकळी गाठून त्या ठिकाणी छापा टाकला. येथे विनापरवाना झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, तीन आरोपी फरार झाले आहेत.
विशेष पथकाचे फौजदार विश्वास खोले, चंद्रकांत पवार, कर्मचारी नीलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, यशवंत वाघमारे, राहुल चिंचाणे, शंकर गायकवाड, अजहर पटेल, दीपक मुदिराज, विष्णू भिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यात रोख ३९ हजार ७२० रुपये, २ लाख १० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी, १० लाख रुपये किमतीची एक चारचाकी गाडी, असा १२ लाख ४९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी नीलेश भुजबळ यांच्या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.