जुगार अड्ड्यावर धाड, सात जणांवर गुन्हा
By ज्ञानेश्वर भाले | Published: March 28, 2024 04:57 PM2024-03-28T16:57:16+5:302024-03-28T16:57:27+5:30
पोलिसांनी रोख रकमेसह तिघांना ताब्यात घेतले. तर चारजण पळून गेले
सेलू (जि.परभणी) : हादगाव पावडे शिवारात एका झाडाखाली अंदर-बाहर नावाच्या जुगारावर खेळणाऱ्यांवर सेलू पोलिसांनी कारवाई केली. यात रोख रकमेसह तिघांना ताब्यात घेतले. तर चारजण पळून गेल्याने सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.
हादगाव पावडे शिवारात महादेव पावडे यांचे शेत आहे. शेतातील लिंबाच्या झाडाखाली अंदर-बाहर नावाचा पत्त्यांच्या जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पो.ना. माधव कांगणे यांचे पथकाने सोमवारी धाड टाकली असता सातजण जुगार खेळताना आढळून आले. त्यापैकी रोख रक्कम २ हजार ३८० रुपये व जुगार साहित्यासह भाऊसाहेब पावडे, दासू राऊत, परसू पावडे यांना ताब्यात घेतले, तर विष्णू उगले, फिरोज पठाण, परमेश्वर, पावडे, आसाराम काळदाते हे पोलिसांना पाहून पळून गेले. याप्रकरणी पो.नि.दीपक बोरसे यांच्या आदेशानुसार सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार शिवदास सूर्यवंशी हे तपास करीत आहेत.