अवैध सावकारी प्रकरणात सेलूत दोन ठिकाणी धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:10+5:302021-06-19T04:13:10+5:30
परभणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्यामार्फत नियुक्त केलेल्या ...
परभणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्यामार्फत नियुक्त केलेल्या पथकाने १७ जून रोजी सेलू येथील पांडुरंग रामकिशन सावंत (रा. दत्तनगर, सेलू) व शिवहरआप्पा राधाप्पा वाळके (रा. यशवंतनगर, सेलू) यांच्या राहत्या घरी दोन वेगवेगळ्या पथकांनी धाड टाकली. यामध्ये घरझडती घेण्यात आली. दोन्ही ठिकाणी घर झडतीमध्ये अवैध सावकारीसंदर्भातील संशयित दस्तऐवज आढळून आले. ही कारवाई सहायक निबंधक उमेशचंद्र हुसे, एस.व्ही. अब्दागिरे, बी.एस. नांदापूरकर यांच्यासह पथकप्रमुख पी.बी. राठोड व सहकार अधिकारी ए.जी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली. याबाबत संबंधितांचे म्हणणे सादर झाल्यानंतर अवैध सावकारी सिद्ध झाल्यास पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाने कळविले आहे.