रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:02+5:302021-03-18T04:17:02+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यापूर्वी १४ मार्च रोजी होणार होती. कोरोनामुळे ती अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यापूर्वी १४ मार्च रोजी होणार होती. कोरोनामुळे ती अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांनी राज्यातील विविध शहरांमध्ये आंदोलने केली होती. परिणामी ही परीक्षा २१ मार्च रोजी घेण्याचे एमपीएससीने जाहीर केले. असे असले तरी या दिवशी रेल्वेची नियोजित वेळेनुसार ३२ हजार २०८ जागांसाठी परीक्षा होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची गोची झाली आहे. त्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. परिणामी उमेदवार संतप्त आहेत.
रेल्वेची परीक्षा होणार ऑनलाइन
रेल्वेची ३२ हजार २०८ जागांसाठीची ही परीक्षा आधीच जाहीर झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. यासाठी निश्चित शुल्क भरून तयारीही केली आहे. आता एमपीएससी किंवा रेल्वे यापैैकी एका परीक्षेची निवड उमेदवारांना करावी लागणार असल्याने त्यांना फटका बसला आहे.
केंद्रांवर पोहोचण्यासाठी परीक्षार्थींची कसरत
जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १५ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. सध्या कोरोनाचा कालावधी आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शिवाय ग्रामीण भागातून मोजकीच वाहने शहराच्या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे संबंधित वाहनातून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
दोन्ही परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी म्हणतात,
सरकारने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे खेळणे केले आहे. अगोदरच बेरोजगारी, त्यात दोन्ही परीक्षा एकत्रित घेतल्याने उमेदवारांची एका बाजूची संधी जाऊन नुकसान होणार आहे.
सोनाली वायगंडे, परीक्षार्थी, नरवाडी
आयोगाचा निर्णय त्रासदायक आहे. सरकारने अनेकवेळा होतकरू व बुद्धिमान तरुणांना मिळणार्या संधीपासून दूर ठेवले आहे. शासनाने चिंतन करावे.
दयानंद सपकाळ, परीक्षार्थी, सोनपेठ
बहुतांश उमेदवारांचे पेपर एकाच दिवशी आल्याने विनाकारण एका परीक्षेस अनुपस्थितीत रहावे लागणार आहे. शासनाने काहीतरी पावले उचलून उमेदवारांचे नुकसान टाळावे.
सहदेव निवळकर, परीक्षार्थी, सेलू