मानवत रोड ते सेलू दरम्यान रेल्वेरूळ तुटला; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली
By राजन मगरुळकर | Published: July 19, 2023 09:02 AM2023-07-19T09:02:37+5:302023-07-19T09:03:01+5:30
मानवत रोड सेलू दरम्यान रेल्वेरूळ तुटल्याचा प्रकार ; कोणतीही हानी नाही
परभणी : परभणी - मानवतरोड - सेलू मार्गावर मानवतरोड ते सेलू स्थानकाच्या दरम्यान ढेंगली पिंपळगाव जवळ धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस रेल्वे जात असताना रेल्वे रुळाचा स्लीपरचा एक भाग तुटल्याचे आढळून आले. ही घटना बुधवारी सकाळी सात ते आठच्या दरम्यान घडली आहे. त्यामुळे रेल्वे याच ठिकाणी थांबविण्यात आली.
या घटनेत कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच मदत कार्य करण्यासाठी यंत्रणा घटनास्थळी येत असल्याचे समजते. रेल्वे रुळाच्या एक स्लीपर कशामुळे तुटला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर येथून परभणीकडे तसेच परभणीकडून जालन्याकडे जाणाऱ्या रेल्वे च्या काही फेऱ्या विलंबाने धावत आहेत.
असा टळला अपघात
प्राथमिक माहितीनुसार गॅंगमन तसेच रेल्वेच्या सतर्क असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे सदरील रेल्वे रुळाच्या स्लीपर चा एक भाग तूटल्याचे लक्षात आले. रेल्वे गार्ड तसेच लोको पायलट चालक यांना ही बाब समजताच त्यांनी प्रसंगावधान राखून रेल्वेची गती कमी करून रेल्वे थांबविली. काही वेळानंतर मराठवाडा रेल्वे जालना कडे मार्गस्थ झाली.