अहो आश्चर्य ! जोरदार पाऊस झाल्यानंतरही मापकानुसार 'पर्जन्यच' नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:35 AM2020-06-22T11:35:11+5:302020-06-22T11:39:01+5:30
या प्रकारामुळे पर्जन्यमापकावर शंका उपस्थित केली जात आहे.
पाथरी : दोन गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतरही पर्जन्यमापकावर मात्र शून्य नोंद झाल्याने पर्जन्यमापकाविषयी आता शंका निर्माण झाल्या आहेत.
तालुक्यातील पावसाची नोंद घेण्यासाठी महसूल मंडळनिहाय पर्जन्यमापके बसविण्यात आली आहेत. पाथरी तालुक्यामध्ये तीन मंडळ असून तीन ठिकाणी पर्जन्यमापक बसविण्यात आली आहेत. पाथरी मंडळात १३ गावे असून पाथरी शहरातील तहसील कार्यालयात पर्जन्यमापक बसविले आहे. २० जून रोजी रात्री या मंडळातील रेणापूर आणि वाघाळा या दोन गावांच्या शिवारात जोरदार पाऊस झाला. २१ जून रोजी पाथरी येथील पर्जन्यमापकावर या पावसाची नोंद होणे अपेक्षित होते. मात्र या पर्जन्यमापकाने शून्य मि.मी. पावसाची नोंद दर्शविली आहे. या प्रकारामुळे पर्जन्यमापकावर शंका उपस्थित केली जात आहे.
दुष्काळ ठेवण्यासाठी पाऊस महत्त्वाचा घटक
महसूल प्रशासनाने घेतलेल्या पावसाच्या नोंदीवरून जिल्ह्यातील दुष्काळाची आणि नुकसानीची नोंद घेतली जाते. त्यामुळे पर्जन्यमापक हा महत्त्वपूर्ण घटक आहे. मात्र या पर्जन्यमापकद्वारे अचूक नोंदी होत नसतील तर त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
या पावसाळी हंगामात पाथरी मंडळात दोन वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. मात्र प्रत्यक्षात या भागातील पिकांचे कुठलेही नुकसान झाले नाही. तर दुसरीकडे दोन गावात मोठा पाऊस झाला असताना पर्जन्यमापकाने नोंदच घेतली नाही. पर्जन्यमापकाच्या नोंदीतील विसंगतीमुळे शंका व्यक्त केली जात आहे.