मुसळधार पावसाचा तडाखा; मंगरूळ ते सारंगापूर रस्त्यावरील पूल गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 14:25 IST2024-06-11T14:25:41+5:302024-06-11T14:25:49+5:30
सारंगपूर येथील ग्रामस्थ, शेतकरी मंगरूळपर्यंत आणि तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी करतात.

मुसळधार पावसाचा तडाखा; मंगरूळ ते सारंगापूर रस्त्यावरील पूल गेला वाहून
- सत्यशील धबडगे
मानवत (परभणी): तालुक्यातील मंगरूळ ते सारंगापूर दरम्यान असलेल्या रस्त्यावरील पूल सोमवारी रात्री मुसळधार पावसाच्या तडाख्याने वाहून गेला. यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे.
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओढ्याला मोठयाप्रमाणावर पाणी आले होते. मंगरूळ (बु) शिवारात जोरदार पाऊस झाल्याने शिवारातून गेलेल्या नदीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. या पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे मंगरूळ ते सारंगपूरदरम्यान असलेल्या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. रामपुरी, सारंगपूर, हटकरवाडी या गावातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी यांची मोठी हेळसांड यामुळे होत आहे. पूल वाहून गेल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तत्काळ पूल दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सारंगापूरकरांना घालावा लागणार १५ किमीचा वळसा
तालुक्यातील सारंगपूर येथील ग्रामस्थ, शेतकरी मंगरूळपर्यंत येण्यासाठी आणि तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या पुलाचा उपयोग करतात. मात्र, या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने सारंगपूर येथील ग्रामस्थांना पाथरी ते परभणी रस्त्यावर येण्यासाठी रामपुरीमार्गे आठ किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक फटक्यासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.