इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी १९ विद्यापीठांचे संघ परभणीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:17 PM2017-11-06T15:17:17+5:302017-11-06T15:19:03+5:30

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात सुरु झालेल्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवामध्ये १९ कृषी आणि अकृषी विद्यापीठातील ७१४ कलावंत विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

For the Rainbow Youth Festival, 19 teams of the Universities were admitted to Parbhani | इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी १९ विद्यापीठांचे संघ परभणीत दाखल

इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी १९ विद्यापीठांचे संघ परभणीत दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ५ ते ९ नोव्हेंबर या काळात १५ व्या आंतरराज्य विद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सवाला सुरुवात झालीइंद्रधनुष्य युवक महोत्सवामध्ये १९ कृषी आणि अकृषी विद्यापीठातील ७१४ कलावंत विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

परभणी : वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात सुरु झालेल्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवामध्ये १९ कृषी आणि अकृषी विद्यापीठातील ७१४ कलावंत विद्यार्थी सहभागी झाले आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष कला सादरीकरणाला प्रारंभ झाला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ५ ते ९ नोव्हेंबर या काळात १५ व्या आंतरराज्य विद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सवाला सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यानंतर दुपारी ३.३० वाजेपासून विविध कलामंचावर कला प्रकाराचे सादरीकरण केले जात आहे. संगीत, नाटक, वाद- विवाद, चित्रकला अशा विविध कला प्रकारांचे दररोज सादरीकरण होणार आहे.

राज्यातील कानाकोप-यातून आलेले विद्यार्थी संपूर्ण तयारीनिशी महोत्सवात दाखल झाले असून आपल्या कलांचे सादरीकरण करण्यापूर्वी सराव करीत असताना पहावयास मिळाले. विद्यार्थ्याच्या संघासमवेत त्यांचे मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि सहकारी मित्रही युवक महोत्सवात दाखल झाले असून पाच दिवस विविध कला सादर केल्या जाणार आहेत. ९ आॅक्टोबर रोजी खा.बंडू जाधव यांच्या उपस्थितीत या युवक महोत्सवाचा समारोप होणार असून समारोप कार्यक्रमात महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित केले जाणार आहे. 

तीन मंचावरुन विद्यार्थ्यांनी  केले कलेचे सादरीकरण
सकाळपासूनच विद्यार्थी आपली कला सादर करण्यासाठी उत्सुक असल्याचे पहावयास मिळाले. संपूर्ण विद्यापीठ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच दिवस या भव्य मंचावरुन विद्यार्थी आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.  रविवारी उद्घाटनानंतर दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास स्कीट या कला प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. राज्यातील विविध विद्यापीठांतील १८ संघांनी स्कीट या कलाप्रकारात सहभाग घेतला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत विद्यर्थ्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संगीत या कला प्रकारामध्ये शास्त्रीय वैयक्तिक वाद्य वादन ही कला सादर करण्यात आली. याच परिसरात उभारलेल्या एका मंचावर वाद-विवाद स्पर्धा घेण्यात आली. या कला प्रकारांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना उत्साहही वाखाणण्याजोगा होता. 

विद्यार्थ्यांनी टिपला कुंचल्याने निसर्ग
कृषी विद्यापीठातील वेगवेगळ्या कोप-यात बसून आपल्या कुंचल्यात निसर्गचित्र रेखाटणारे स्पर्धक युवक महोत्सवात आकर्षण ठरले होते. निमित्त होते, फाईन आर्ट कला प्रकाराचे. रविवारी विद्यार्थ्यांना ‘आॅन द स्पॉट पेंटींग’ रेखाटण्याचा विषय परिक्षकांनी दिला होता. उद्घाटनानंतर दुपारच्या सत्रात  कला प्रकारांच्या सादरीकरणास प्रारंभ झाला.‘फाईन आर्ट’ या कला प्रकाराच्या पहिल्याच दिवशी आॅन द स्पॉट पेंटींग हा विषय देण्यात आला. या स्पर्धेत १९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विषयानुसार विद्यार्थ्यांनी विद्यापीठातीलच निसर्ग आपल्या कुंचल्यात उतरविण्याचा निर्णय घेतला आणि एक-एक विद्यार्थी विद्यापीठाच्या परिसरातच कॅन्व्हास, ब्रश, रंग घेऊन कामाला लागला. 

ललित कला समितीच्या अध्यक्षा डॉ.जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. प्रा.अमोल सोनकांबळे यांच्यासह इतर प्राध्यापकांनी स्पर्धेचे नियोजन केले. या स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील माजी प्राचार्य दिलीप बडे, मुंबई येथील सतीश माने, दापोली येथील प्रा.सरफराज दिलदार बटे आदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

विद्यापीठ परिसरातून काढली रॅली
युवक महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी विद्यापीठ परिसरातील रस्त्यांवरुन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये राज्यभरातील विद्यार्थी सहभागी झाले होते. उद्घाटन समारंभापासून निघालेली ही रॅली विद्यापीठातील विविध भागातून उद्घाटन स्थळापर्यंत पोहचली. 

निवास व भोजनाची व्यवस्था
यजमान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने या युवक महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ परिसरातच निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. 

Web Title: For the Rainbow Youth Festival, 19 teams of the Universities were admitted to Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.