परभणीत पावसाचे थैमान; दुधना-कसुरा नदीच्या पुराने पाथरी ते परभणी महामार्ग बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 05:11 PM2024-09-02T17:11:47+5:302024-09-02T17:12:01+5:30
अनेक ओढया, नाल्याला पूर आल्याने ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प
- मोहन बोराडे
सेलू (परभणी ) : दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधना, कसुरा, करपरा या मुख्य नद्यांना पूर आल्याने सेलू- मानवत- परभणी, सेलू- पाथरी हे प्रमुख महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ओढया, नाल्याला पूर आल्याने ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प असून अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला आहे. दरम्यान, वाई, बोध येथे पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे.
शनिवारी मध्यरात्री व रविवारी दिवसभर व रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने दुधना, कसुरा, करपरा या मुख्य नद्यांना पूर आला आहे. तसेच ग्रामीण भागातील जोड रस्त्यावरील ओढ्या, नाल्याला पूर आल्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक बंद झाली आहे. कुंडी पाटीवरील कसूर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सेलू- पाथरी तसेच सेलू मानवत रस्त्यावरील ढेंगळी पिंपळगाव येथील कसूर नदीच्या पुलावरून पाणी आल्याने सेलू- मानवत- परभणी हा रस्ता बंद झाला आहे. सेलू- वालूर मार्गावरील राजवाडी येथील दुधना नदीच्या पुलावरून पाणी आल्याने रविवारपासून हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.
तसेच शहराच्या मधोमध वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्यामुळे रविवारी रात्री नालाशेजारी असलेल्या हेमंत नगर व शिवाजी नगरातील घरामध्ये पाणी घुसून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील गिरगाव येथील तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळे गावाला पाण्याचा वेढा पडला होता. पुराच्या पाण्यामुळे वाई, बोध, बोरकिनी येथील जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतात पाणी साचले आहे. दरम्यान, रविवार व सोमवार सलग दोन दिवस संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
उजवा कालवा फुटला
मुसळधार पावसामुळे कसुरा नदीला पूर आला आहे. तसेच निपाणी टाकळी येथील नाल्याला देखील पुर आल्यानंतर टाकळी शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाचा कालवा फूटला असून पिकांचे नुकसान झाले आहे.