परभणी जिल्ह्यात पाऊस: दोन तास पाच गावांचा तुटला संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:45 AM2018-06-09T00:45:38+5:302018-06-09T00:45:38+5:30
शहरापासून जवळच असलेल्या लेंडी नदीच्या पात्रातील जांभुळबेट रस्त्यावरील नळकांडी पुलावर पुराचे पाणी आल्याने पाच गावांचा संपर्क ८ जून रोजी दुपारी १ वाजता तुटला होता. दोन तासांनी पाणी ओसरल्याने या मार्गावरुन पूर्ववत वाहतूक सुरू झाली. दरम्यान कमी उंचीच्या पुलाचा ग्रामस्थांना फटका बसत असून दहा वर्षांपासून हा प्रश्न रखडलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी, पालम : शहरापासून जवळच असलेल्या लेंडी नदीच्या पात्रातील जांभुळबेट रस्त्यावरील नळकांडी पुलावर पुराचे पाणी आल्याने पाच गावांचा संपर्क ८ जून रोजी दुपारी १ वाजता तुटला होता. दोन तासांनी पाणी ओसरल्याने या मार्गावरुन पूर्ववत वाहतूक सुरू झाली. दरम्यान कमी उंचीच्या पुलाचा ग्रामस्थांना फटका बसत असून दहा वर्षांपासून हा प्रश्न रखडलेला आहे.
पालम शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु झाला. सकाळी ७ वाजेपासून पावसाने हजेरी लावली होती. यामुळे नदीनाले, ओढे खळखळून वाहत आहेत. तालुक्यातील गळाटी व लेंडी नदीला पूर आला होता. पालम ते जांभूळबेट रस्त्यावर शहरापासून अवघ्या अर्धा कि.मी.वर लेंडी नदीच्या पात्रात जुना कमी उंचीचा पूल आहे. पुलाच्या नळ्या मातीने बुजून गेल्या असून पात्र सपाट झाल्याने पाऊस पडताच पुराचे पाणी पुलावर येते. परिणामी वाहतूक बंद पडते. ८ जून रोजी दुपारी १२ वाजता पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली होती. हे पाणी वाढल्याने दुपारी १ वाजता वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड व उमरथडी गावाचा संपर्क दोन तासांसाठी तुटला होता. ग्रामस्थांना नदी काठावर बसून पूर ओसरण्याची वाट पहावी लागली.
मागील वर्षी तब्बल २३ वेळा पुरामुळे या ५ गावांचा संपर्क तुटला होता. नेहमी ही समस्या निर्माण होत असताना पुलाची उंची वाढविण्याकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान, यावर्षीच्या पहिल्याच पावसात तालुक्यातील पाचही गावांचा संपर्क तुटल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मान्सूनपूर्व पावसाने सुखावला शेतकरी
जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नसला तरी मान्सूनपूर्व पाऊस होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी बहुतांश तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतरच प्रत्यक्ष पेरण्यांना सुरुवात होणार असल्याने शेतकºयांना मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात वातावरणात बदल होऊन पावसाला प्रारंभ झाला.परभणी शहरामध्ये शुक्रवारी सकाळपासूनच काळेकुट्ट ढग जमा झाले होते. सकाळी १० वाजेपर्यंत आभाळ काळोखून आले असले तरी पावसाला सुरुवात झाली नव्हती. मात्र १० वाजेनंतर रिमझिम पाऊस सुरु झाला. परभणी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी शुक्रवारी तालुकाभरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी साचले होते. पहिल्याच पावसाने रस्त्यांची दुरवस्था झाली असून शहरालगतच्या वसाहतींमधील रस्ते चिखलमय झाले होते. पालम, गंगाखेड, पूर्णा, जिंतूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सोनपेठ, पाथरी, सेलू या तालुक्यांमध्ये हलका पाऊस झाला.
परभणी शहरातील रस्त्यांची दुरवस्था
शुक्रवारी परभणी शहरात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. शहरातील रस्त्यांवर आधीच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. शहर परिसरातील वसाहतींमध्ये तर सर्व रस्ते चिखलमय झाले. पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारक, पादचारी त्रस्त झाले होते.
घरांमध्ये शिरले पाणी
गंगाखेड परिसरात पहाटे ३ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. सर्वदूर मध्यम स्वरुपाचा हा पाऊस झाला. पहिल्याच पावसात शहरवासियांची दाणादाण उडाली. रझा कॉलनीत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. रझा कॉलनी भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. हे पाणी अनेक घरांमध्ये शिरले. भगवतीनगर परिसरातही रस्त्यावर गुडघ्याइतके पाणी साचल्याने मार्ग शोधताना नागरिकांची धांदल उडाली. गंगाखेड बसस्थानक परिसरातील नाला तुंबल्याने स्थानक परिसरात पाणी साचून तळ्याचे स्वरुप आले होते. तालुक्यात दुपारपर्यंत हा पाऊस सुरु होता.
डिघोळ परिसरात जोरदार हजेरी
सोनपेठ तालुक्यातील डिघोळ, निमगाव, बोंदरगाव शिवारात शुक्रवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नाले प्रथमच वाहू लागले. पेरणीचीही तयारी शेतकरी करु लागला आहे. मान्सूनपूर्व पाऊस होत असल्याने शेतकºयांच्या आशा उंचावल्या असल्या तरी मान्सूनचा दमदार पाऊस होईपर्यंत शेतकºयांना पेरण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पूर्णा तालुक्यात जोरदार
पूर्णा- तालुक्यात तीन दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस होत असून शुक्रवारी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील चारही मंडळात मध्यम स्वरुपाचा सरी बसरल्या. शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासून पावसाचा वेग वाढला होता. सकाळी ११ वाजेपासून हा पाऊस सुरु होता. पावसाच्या आगमनामुळे जमिनीची धूप कमी झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सोयाबीनच्या पेरणीस अजून अवधी असला तरी कापूस लागवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पावसाच्या आगमनामुळे यावर्षी वेळेत पेरण्या होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुक्यात शुक्रवारी पहाटेपासूनच दुपारी १२ वाजेपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाची भूर्रभूर सुरु होती.