परभणी जिल्ह्यात पूर्णा, गंगाखेडमध्ये जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:13 AM2019-06-25T00:13:02+5:302019-06-25T00:13:16+5:30
जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात चार दिवसांपासून पाऊस सुरु असून सोमवारी पूर्णा व गंगाखेड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याशिवाय रविवारी रात्री सेलू व परिसरात तब्बल २१ मि.मी. पाऊस झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा/ गंगाखेड (परभणी): जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात चार दिवसांपासून पाऊस सुरु असून सोमवारी पूर्णा व गंगाखेड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याशिवाय रविवारी रात्री सेलू व परिसरात तब्बल २१ मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मृग नक्षत्रापासून पाऊस नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे बळीराजा अस्वस्थ झाला होता. २१ जून रोजी जिल्ह्यातील विविध भागात सरासरी ६.८१ मि.मी. पाऊस झाला. २२ जून रोजी २.४२ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर या दिवशी रात्री सरासरी ६.३३ मि.मी. पाऊस झाला. यामध्ये सेलू तालुक्यात २१ मि.मी. तर मानवत तालुक्यात १६ आणि पाथरी तालुक्यात ९.३३ मि.मी.पावसाची नोंद झाली. या व्यतिरिक्त परभणी तालुक्यात ५ तर पूर्णा तालुक्यात ५.६० मि.मी.पावसाची सोमवारी सकाळी महसूल विभागाकडे नोंद झाली. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी ३.२५ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरात जोरदार पाऊस सुरु झाला. जवळपास १ तास विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र काही गावांमध्ये तूरळक स्वरुपाचा पाऊस झाला.
पूर्णा तालुक्यातही सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. ताडकळस मंडळातील खांबेगाव, महातपुरी, गणपूर तसेच निळा शिवारात दमदार पावसाने हजेरी लावली. तर कात्नेश्वर मंडळात नांदगाव, झिरोफाटा, एरंडेश्वर भागातही चांगला पाऊस झाला. पूर्णा शहर व परिसरातही पावसाने हजेरी लावली. चुडावा, गौर परिसरात मात्र पाऊस झाला नाही. या पावसामुळे जिल्ह्यातील खोळंबलेल्या पेरण्यांना सुरुवात होणार आहे.
सोनपेठ शहर व परिसरात दुपारी ४.२५ वाजेच्या सुमारास जवळपास २० मिनिटे पाऊस झाला. तालुक्यातील डिघोळ येथेही जवळपास १ तास पाऊस झाला. या पावसाने बळीराजा सुखावला आहे. परभणी शहरातही दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.
याशिवाय मानवत तालुक्यातील मानोली व परिसरातही दमदार पावसाने हजेरी लावली. रामपुरी व परिसरातही २० जून रोजी चांगला पाऊस झाला. खरीपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
पाच घरात पाणी शिरले
४गंगाखेड शहरात झालेल्या दमदार पावसानंतर रजा कॉलनी भागात नालीचे पाणी तुंबून पाच ते सहा घरांमध्ये शिरले. यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय शहरातील रस्त्यावर व बसस्थानक परिसरात पाण्याचे डबके साचल्याचे पहावयास मिळाले.
४बसस्थानकात गेल्या अनेक वर्षापासून थोडाही पाऊस झाला तरी पाण्याचे डोह साचतात. यामुळे प्रवाशांना कसरत करीत बसमध्ये चढावे लागते. याकडे एस.टी.महामंडळाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
जिल्ह्यात : सरासरी ५ टक्केच पाऊस
४यावर्षीच्या पावसाळी हंगामात १ ते २३ जून या काळात वार्षिक सरासरीच्या ५ टक्के पाऊस जिल्ह्यामध्ये झाला आहे. परभणी तालुक्यामध्ये ३.५ टक्के (८६२.६० ), पालम तालुक्यात ५ टक्के (६९७), पूर्णा तालुक्यात ५.३ टक्के (८०४.४०), गंगाखेड ७.५ टक्के (६९७), सोनपेठ ५.१ टक्के (६९७), सेलू ४.८ टक्के (८१६.७०), पाथरी ४.६ टक्के (७६८.५०), जिंतूर ४.१ टक्के (८११.७०) तर मानवत तालुक्यामध्ये वार्षिक सरासरीच्या तुुलनेत ७.८ टक्के (८१६.७०) पाऊस झाला आहे. कंसातील आकडे तालुक्याच्या वार्षिक सरारीचे आहेत.