पावसाची उघडीप, पेरण्या थांबवल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:13 AM2021-06-24T04:13:55+5:302021-06-24T04:13:55+5:30
जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे दमदार आगमन झाले होते. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही पाऊस सातत्य राखेल, अशी भाबडी आशा घेऊन ...
जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे दमदार आगमन झाले होते. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही पाऊस सातत्य राखेल, अशी भाबडी आशा घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली. घाईने लागवड केलेल्या शेतकऱ्यांची उगवण चांगली झाली असून, उशिराने लागवड केलेल्या कपाशीच्या क्षेत्रात मात्र मोठ्या प्रमाणात तूट निर्माण झाली आहे. शिवाय उगवण आलेल्या रोपांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांच्यावर दुबार लागवडीची वेळ आली आहे. आतापर्यंत ६० टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या असून, पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी उर्वरित पेरण्या थांबवल्याचे चित्र आहे. आता दमदार पाऊस झाल्यानंतरच उर्वरित पेरण्यांना वेग येणार आहे. सध्या लवकर लागवड झालेल्या कापूस पिकात वखरणी, खुरपणी आदी आंतरमशागतीची कामे शेतकऱ्यांकडून सुरू आहेत. कोवळ्या पिकांना पावसाची गरज असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा मात्र आता आकाशाकडे लागल्या आहेत.