राजगड ते रायगड थरारक गिरीभ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:12 AM2021-01-01T04:12:14+5:302021-01-01T04:12:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : परभणीतील स्वराज्य ट्रेकर्सच्या नेतृत्वाखाली ६८ जणांनी नुकताच राजगड - तोरणा - रायगड हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणीतील स्वराज्य ट्रेकर्सच्या नेतृत्वाखाली ६८ जणांनी नुकताच राजगड - तोरणा - रायगड हा थरारक गिरीभ्रमंतीचा अनुभव घेतला. शिलेदार अॅडव्हेंचर क्लब, मुंबईने या मोहिमेचे आयोजन केले होते.
दिनांक २३ डिसेंबर रोजी माेहिमेत सहभागी झालेले सर्वजण राजगडाच्या पायथ्याशी असलेले आडवली (ता. वेल्हा, जि. पुणे) या गावात मुक्कामी पोहोचले. त्यानंतर २४ डिसेंबर रोजी सकाळी राजगड चढून झाल्यानंतर बालेकिल्ला, सुवेळा माची, पद्मावती माची आदी ठिकाणे पाहण्यात आली. महाराणी सईबाईंच्या समाधीचे दर्शन घेऊन रात्रीचे जेवण करुन सर्वांनी राजगडावर मुक्काम केला. रात्री १ वाजता शिलेदार अॅडव्हेंचर क्लबचे सागर नलावडे व त्यांचा ग्रुप राजगडावर पोहोचला. दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता सर्वांनी संजीवनी माचीमार्गे आळू दरवाजातून तोरणा किल्ल्याकडे कूच केली. दुपारी २ वाजता सर्वजण तोरणा किल्ल्यावर पोहोचले. वाघजाई दरवाजामार्गे भट्टी गावातील राम मंदिरात मुक्काम करण्यात आला.
२६ डिसेंबर रोजी भट्टी नावाच्या छोट्या गावातून सिंगापूर नाळेमार्गे सुमारे ३३ किलोमीटरचे अंतर पार करुन वारंगी गावात मुक्काम करण्यात आला. २७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता वारंगीहून रायगडाकडे प्रयाण करण्यात आले. या मार्गावर अनेकदा लिंगाणा सुळक्याचे दर्शन झाले. सकाळी ११ वाजता सर्वजण रायगडावर पोहोचले. संपूर्ण गड पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यात आले. एकूण ५ दिवसांचा हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. बेंगलोर, हैदराबाद, औरंगाबाद, नांदेड, औंंढा आणि परभणी जिल्ह्यातील मिळून ६८ जण स्वराज्य ट्रेकर्सचे प्रमुख मार्गदर्शक माधवराव यादव व राजेश्वर गरुड यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेत सहभागी झाले होते.