परभणी येथे शासकीय वसतीगृहातील मुलींचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 03:15 PM2017-12-08T15:15:39+5:302017-12-08T15:17:29+5:30
शासकीय वसतिगृहातील मुलींनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिका-यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून वसतिगृहास भेट देण्याचे आश्वासन दिले.
परभणी : शासकीय वसतिगृहातील मुलींनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिका-यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून वसतिगृहास भेट देण्याचे आश्वासन दिले.
शहरातील धाररोडवर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहामध्ये ६५ मुली निवास करतात. या मुलींना शासनाच्या वतीने विविध सुविधा देण्यात येतात. मात्र, मागील काही दिवसांपासून वसतिगृह प्रशासनाच्या वतीने मिळणारे स्टेशनरी व इतर भत्ते मुलींना उपलब्ध झाले नाहीत. वारंवार मागणी करूनही भत्ते व इतर सुविधा मिळत नसल्याने मुलींनी आज सकाळी ११ वाजता वसतिगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन वसतिगृहात येणा-या अडचणी सांगितल्या. तसेच शासनाच्या वतीने देण्यात येणारा भत्ता तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हाधिका-यांनी वसतिगृहास भेट देण्यात येईल, असे आवश्वासन दिले. या आंदोलनात मुक्ता तिडके, रुपाली खिल्लारे, स्वाती देवकर, अफसाना शेख आयुब, वर्षा वाव्हळे, उमा पुंडगे, मीरा आसोरे, पुजा साळवे, वर्षा साबळे, उषा हारकळ, राजश्री टोंपे, साधना वायवळ, नेहा लोणकर, मुक्ता बुधवंत, प्रज्ञा बनसोडे, विद्या जाधव आदींसह ४३ विद्यार्थिनींचा सहभाग होता.