घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 04:21 PM2017-09-11T16:21:53+5:302017-09-11T16:22:15+5:30
महानगरपालिकेने केलेल्या अन्यायकारक घरपट्टी आणि मालमत्ता कर वाढीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भव्य स्वरूप प्राप्त झालेल्या या मोर्चात शिवसैनिकांसह शहरातील नागरिक, व्यापारी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते.
परभणी, दि. 11 : महानगरपालिकेने केलेल्या अन्यायकारक घरपट्टी आणि मालमत्ता कर वाढीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भव्य स्वरूप प्राप्त झालेल्या या मोर्चात शिवसैनिकांसह शहरातील नागरिक, व्यापारी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते.
परभणी महापालिकेने घरपट्टीत वाढ केली असून त्याच्या वसुलीच्या नोटिसाही नागरिकांनी बजावल्या आहेत. अनेकांना पूर्वीच्या घरपट्टीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के वाढीव घरपट्टी लादण्यात आली. अचानक झालेल्या या वाढीचा नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. यामुळे शिवसेनेतर्फे खा. बंडू जाधव व आ. डॉ. राहुल पाटील यांनी मोर्चाचे आयोजन केले. दुपारी १२ वाजता शहरातील शनिवार बाजार येथून मोर्चाला प्रारंभ झाला. महापालिकेच्या करवाढी विरोधात घोषणा देत हा मोर्चा शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा देवी मंदिर, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोंचला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख विद्या सरपोतदार, जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. संजय कछवे, माजी आ. मीराताई रेंगे, माजी विरोधी पक्ष नेत्या अंबिका डहाळे, व्यापारी महासंघाचे सूर्यकांत हाके, नगरसेवक सचिन अंबिलवादे, रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष डी.एन. दाभाडे, गाळेधारक संघटनेचे चंद्रकांत डहाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यापारी महासंघ, रिपब्लिकन सेना, रिपाइं यांच्यासह शहरातील जवळपास ५० संघटनांनी या मोर्चास पाठिंबा दिला.