परभणी येथे शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 04:06 PM2017-12-08T16:06:32+5:302017-12-08T16:10:28+5:30
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
परभणी : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
परभणी विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ.राहुल पाटील, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, परभणी विधानसभा निरीक्षक जगदीश चौधरी, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख सदाशीव देशमुख, संजय गाडगे, माणिक पोंढे, नंदकुमार आवचार, संदीप झाडे, ज्ञानेश्वर पवार आदींच्या नेतृत्वात दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील शनिवार बाजार मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी चौक, गांधी पार्क, स्टेशनरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
शासनाने शेतक-यांची फसवणूक केली
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले की, शासनाच्या कचखाऊ धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी ब-यापैकी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध असताना १२ तासही वीज पुरवठा उपलब्ध करुन दिला जात नाही. थकबाकीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जात आहे. रोहित्र जळाल्यानंतर ते लवकर दुरुस्त करुन दिले जात नाही. त्यामुळे पाणी असूनही त्याचा शेतक-यांना उपयोग होत नाही. तसेच जिल्ह्यातील संपूर्ण रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. शासन फक्त घोषणा करते कृती नाही या सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत त्यांनी शासनाने शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी केला.
तीन वर्षात भाजपावाल्यांनी लुटले
तसेच शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले म्हणाले की, नोटाबंदीच्या नावाखाली केंद्र शासनाने सर्व सामान्यांची लूट केली आहे. ६० वर्षात काँग्रेसवाल्यांनी जेवढे लुटले नाही, तेवढे तीन वर्षात या भाजपावाल्यांनी लुटले, असे सांगून अच्छे दिन हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावाल्यांनाच आले असल्याचे ते म्हणाले. शेतीचे उत्पादन दुप्पट करण्यात येईल, असे एकीकडे पंतप्रधान सांगत आहेत. तर दुसरीकडे शेतक-यांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे, मग उत्पन्न कुठून दुप्पट होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेच्या पाठीमागे उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. यासोबतच निरीक्षक चौधरी, जिल्हासहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव आदींची भाषणे झाली.
या आहेत मागण्या
सभेनंतर जिल्हाधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये सोयाबीन, कापसासाठी हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, महावितरणने दिवसभर भारनियमन करु नये, तोडलेले वीज कनेक्शन जोडून द्यावे, जळालेला ट्रान्सफार्मर २४ तासात बदलून द्यावा, शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, निराधारांना २ हजार रुपये अनुदान द्यावे, निराधारांची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपये करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.