आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या गावात ग्रा.पं.ची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:36+5:302020-12-15T04:33:36+5:30
जिंतूर : तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतीपैकी १०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार ...
जिंतूर : तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतीपैकी १०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे. माजी आमदार, जि.प.चे माजी अध्यक्ष,विद्यमान जि.प. सदस्य यांच्या गावांतील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
जिंतूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यातच महत्वपूर्ण लढती या टप्प्यात होत असल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत चांगलीच रंगत वाढणार आहे. तालुक्यातील सावंगी भांबळे या माजी आ. विजय भांबळे यांच्या गावात वर्षानुवर्षे भांबळे यांची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे हा गड भांबळे यांनी या ठिकाणी आतापर्यंत एकहाती राखला आहे. जि.प.चे विद्यमान उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या बोरी ग्रामपंचायतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून बोरीकडे पाहिले जाते. १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मागील वर्षी अजय चौधरी यांच्याकडे सत्ता होती तर यापूर्वी विद्यमान आ. मेघनाताई बोर्डीकर यांचे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते. ही ग्रामपंचायत आलटून पालटून कल देणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या महत्वपूर्ण ग्रामपंचायतींबरोबरच सर्वात चर्चेत असणारी ग्रामपंचायत चारठाणा आहे. तालुक्यातील दुसरी सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष असते. या ठिकाणी मागच्या वेळी राकाँकडे ही ग्रामपंचायत होती. तर यापूर्वी सातत्याने १५ वर्ष बोर्डीकर गटाच्या अधिपत्याखाली ग्रामपंचायत निवडून येत होती. यावेळेच चित्र मात्र थोडे वेगळे दिसत आहे. राकाँचा एक मोठा गट बाजूला झाला असून, आता राकाँ, भाजपा व नाना राऊत यांचे स्वतंत्र गट झाले असल्याने या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत निर्माण होणार आहे. माजी आ. कै. कुंडलिकराव नागरे यांच्या सावळी बु. ग्रा.पं.वर बोर्डीकर गटाचे वर्चस्व राहिले आहे. यावेळेच नागरे यांचे पुत्र सुरेश नागरे काँग्रेसमध्ये गेल्याने ते आता सावळीमध्ये सत्तेसाठी काय चमत्कार करतात, कोणते डावपेच टाकतात, हे पहावयास मिळणार आहे.
बोरी, चारठाण्याकडे लक्ष
तालुक्यात १०१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्या तरी सर्वाधिक चर्चेची, अटीतटीची व निर्णायक निवडणूक बोरी व चारठाणा येथे होणार आहे. ही दोन्ही गावे तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. त्याचबरोबर जि.प.च्या माजी अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या पिंपळगाव काजळे तांडा, नमीता बुधवंत यांच्या पांगरी ग्रामपंचायतीकडेही लक्ष लागले आहे.