एकाच महिन्याच्या धान्य वितरणावर रेशन कार्डधारकांची बोळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 AM2021-06-23T04:13:18+5:302021-06-23T04:13:18+5:30
कोरोनामुळे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अंत्योदय, प्राधान्य कुटुंब गटातील सर्व रेशनकार्डधारकांना दरमहा प्रतिसदस्य ३ किलो गहू व २ ...
कोरोनामुळे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अंत्योदय, प्राधान्य कुटुंब गटातील सर्व रेशनकार्डधारकांना दरमहा प्रतिसदस्य ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. परभणी जिल्ह्यात याअंतर्गत तब्बल ११ लाख ७९ हजार ९१९ लाभार्थ्यांना दरमहा ४९ हजार १४४ क्विंटल धान्य वितरित करण्यात येत असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात जिल्हा पातळीवरून वितरीत करण्यात आलेले धान्य अनेक रेशनदुकानदारांनी पूर्णपणे वितरीत केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे धान्य कुठे गेले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे मे महिन्याचे धान्य कोरोनामुळे इ-पाॅस मशीनवर रेशनकार्डधारकांऐवजी रेशन दुकानदाराचेच थंब करायचे होते. त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य न देताच काही दुकानदारांनी धान्य वितरित केल्याचा अहवाल शासनाला सादर केल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे याप्रकरणी आता सखोल चौकशी करण्याची मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.
धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा
मे महिन्यापर्यंत इ-पॉस मशीनवर लाभार्थ्याचा अंगठा घेण्यात येत होता; परंतु कोरोना संसर्गाच्या कारणावरून मे महिन्यात रेशन दुकानदाराचाच अंगठा घेण्याची निर्णय झाला.
परिणामी याचा दुरूपयोग अनेक दुकानदारांनी घेतल्याच्या तक्रारी अनेक लाभार्थी करीत आहेत.
प्रशासकीय पातळीवरूनही लाभार्थ्यांना खरोखरंच धान्य दिले गेले का? याची पडताळणी करणारी यंत्रणा कार्यान्वित नाही.
कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा?
चार घरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. मात्र, कोरोनाच्या भीतीने अनेकांकडून आम्हाला घरात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे रोजगार गेला आहे. शासनाकडून मिळणारे धान्यच आधार आहे; परंतु जून महिन्याचे धान्य अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे महिनाभर काय खावे, असा प्रश्न पडला आहे.
- सीताबाई फुके, सेलू
मे महिन्यात केंद्र आणि राज्य शासनाकडून मोफत धान्य देण्यात आले तसेच जून महिन्यात केंद्राकडून मोफत व नियमित धान्यही वितरित करण्यात आले खरे; मात्र धान्य वाटपात तालुक्यात मोठा गोंधळ झाला आहे. एकाचवेळी दोन पावत्या काढून एकच धान्य दिले तर काही ठिकाणी धान्य वाटपच झाले नाही.
- अमोल शिंदे, मरडसगाव, ता. पाथरी
कोरोनामुळे गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे रेशनचे धान्य हाच आधार आहे. मे महिन्याचे रेशनचे मोफत धान्य मिळाले आहे. जून महिन्याचे मोफत धान्य अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे शासनाने तातडीने जून महिन्याचे धान्य देण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना द्यावेत.
- लताबाई डंबाळे, मानवत
जून महिन्याचे धान्य ३० जूनपर्यंत वाटप करावयाचे आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत मोफत धान्य वाटप प्रक्रिया पूर्ण होईल. जिल्ह्यात जवळपास ९० टक्के धान्यवाटप होते.
- मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी