मानवतच्या निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 06:58 PM2018-04-20T18:58:36+5:302018-04-20T18:58:36+5:30
दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मागील काही दिवसांपासून दलालांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मानवत (परभणी ) : येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मागील काही दिवसांपासून दलालांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दलालांमार्फत होणारे नागरिकांचे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी या दलालांना दुय्यम निबंधक कार्यालयात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.
मानवत तालुक्यात गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून खरेदी विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. दाम दुप्पट करण्याचा मार्ग म्हणून रियल इस्टेटकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन होत आहे. त्यामुुळे पैसे वाचविण्याच्या नादात व अज्ञानामुळे आजकाल सर्रास ज्यांना कायद्याची काहीही माहिती नाही, अशा दलालांमार्फत दुय्यम निबंधक कार्यालयात राजरोसपणे खरेदी विक्री, बक्षीस भाडेपट्टा व हक्क सोडपत्र तयार करून नोंदणी केली जात आहे. त्यामुळे लोकांचे आर्थिक, मानसिक नुकसान होत आहे. तसेच नागरिकांना बँकेचे कर्ज मिळणे दुरापास्त झाले आहे. वास्तविक पाहता कोणताही व्यवहार हा कायद्यानुसार हक्काबाबत पडताळणी करूनच तज्ज्ञ व्यक्तीकडून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्ताऐवज नोंदविला गेला पाहिजे.
परंतु, आजघडीला सदर बाबीची पडताळणी न करता सर्रासपणे दलालांमार्फत खरेदी विक्रीचे व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे आज मानवत येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे दलालांच्या विळख्यात सापडले असून दलालांमार्फत दररोज दुय्यम निबंधक कार्यालयात व्यवहार नोंदविले जातात. हे दलाल स्वत:ला कायद्याचे तज्ज्ञ समजून वकील असल्याचे भासवून दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी यांच्यासोबत आमचा वशिला आहे, असे दाखवून दस्तकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. त्यामुळे दलालांमार्फत नागरिकांचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांना बंदी घालावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
वकील संघाने घेतला ठराव
मानवत तालुक्यातील ग्रामीण भागातील दस्त नोंदणीकरिता आलेल्या नागरिकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुबाडणूक करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित दलालांचा निषेध नोंदवून या दलालांना दुय्यम निबंधक कार्यालयात येण्यास मज्जाव करण्यात यावा व त्यांच्याविरुद्ध दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्यात यावी, असा ठराव मानवत वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुनिल जाधव यांनी मांडला. या ठरावाला सूचक म्हणून अॅड. एम. आर. बारहाते यांनी समर्थन दिले. तर के.एन. राठोड यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. यावेळी वकील संघाचे सचिव अॅड. ए.ए. पांडे, अॅड. सुरेश बारहाते, अॅड. सतीश बारहाते, अॅॅड. आर.आर. केरे, अॅड. बी.आर. चिलवंत, अॅड. अमोल जोशी यांच्यासह वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.