येलदरी जलविद्युत केंद्रात साडेपाच लाख युनिट विजेची विक्रमी निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 12:52 PM2020-09-03T12:52:47+5:302020-09-03T12:54:24+5:30
आतापर्यंतच्या वीजनिर्मितीचा हा उच्चांक ठरला आहे.
- प्रशांत मुळी
येलदरी : ५ लाख ४० हजार युनिट प्रतिदिन वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या येलदरी येथील जलविद्युत केंद्रातून १ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ५ लाख ४५ हजार युनिट विजेची विक्रमी निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या वीजनिर्मितीचा हा उच्चांक ठरला आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या पावसाळी हंगामात या केंद्रातून झालेल्या वीजनिर्मितीतून सुमारे ३ कोटी १३ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम ऊर्जा विभागाच्या तिजोरीत या केंद्राने जमा केली आहे.
येलदरी येथील ३३ टीएमसीच्या जलाशयावर ७.५ मेगा वॅट वीज निर्मिती करणाºया तीन संचांच्या साह्याने वीजनिर्मिती केली जाते.
धरण भरल्याने वीजनिर्मिती केंद्रास चांगली कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली. येथील जलविद्युत केंद्राने अवघ्या २० दिवसांत १० दशलक्ष युनिट विजेची निर्मिती केली आहे. १ सप्टेंबर रोजी ५ लाख ४५ हजार युनिट विजेची निर्मिती करून या केंद्राने एका दिवसातील वीजनिर्मितीचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे.
२० दिवसांत ११ लाख युनिट
येलदरी जलविद्युत केंद्रातून सोडलेल्या पाण्यावर दररोज तीन संच चालवून विजेची निर्मिती करण्यात आली. मागील २० दिवसांपासून तिन्ही संच पूर्ण क्षमतेने चालविले जात आहेत. याद्वारे ११ लाख ९ हजार युनिट विज निर्मिती करण्यात आली आहे.