पेट्रोलच्या विक्रमी दरवाढीने महागाईचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:05+5:302021-01-08T04:53:05+5:30
परभणी : मागील दोन-तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असून, गुरुवारी ९३.२१ रुपये प्रतिलिटर या दराने ...
परभणी : मागील दोन-तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असून, गुरुवारी ९३.२१ रुपये प्रतिलिटर या दराने शहरात पेट्रोलची विक्री झाली. इंधनाचे दर वाढत असल्याने पर्यायाने महागाई वाढत आहे.
मागील वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. वर्षभरापूर्वी ८० रुपये लिटरप्रमाणे मिळणाऱ्या पेट्रोलच्या दरात दररोज वाढ होत असल्याने त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या दरांवर होत आहे. पेट्रोलबरोबरच डिझेलच्याही दरात वाढ झाल्याने परराज्यांतून होणारी माल वाहतूक महागली आहे. परिणामी बाजारपेठेतील इतर वस्तूंच्या किमतीतही वाढ होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात ९१ रुपये लिटरप्रमाणे पेट्रोलची विक्री झाली. या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, मागच्या तीन दिवसांपासून पुन्हा इंधनाचे दर वाढत आहेत. तीन दिवसांपासून दररोज पेट्रोलच्या दरात वाढ होत असल्याने वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागत आहे. मध्यंतरी परभणी जिल्ह्यात पेट्रोलचे दर देशात सर्वाधिक होते. आता पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ होत असून, गुरुवारी हे दर ९३.२१ रुपयांवर पोहोचले होते. पेट्रोलबरोबरच डिझेलच्या दरातही वाढ होत असून, गुरुवारी ८२.१४ रुपयांनी डिझेलची विक्री झाली.
असे राहिले दर
पेट्रोल
६ जानेवारी : ९२.२८
७ जानेवारी : ९३.२१
डिझेल
६ जानेवारी : ८१.८६
७ जानेवारी : ८२.१४