सव्वातीन कोटींची वसुली शिल्लकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:32+5:302021-04-28T04:18:32+5:30
परभणी : पीएम किसान योजनेंतर्गत आयकरदात्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या ४ कोटी ४८ लाख ७० हजार रुपयांपैकी १२१६ ...
परभणी : पीएम किसान योजनेंतर्गत आयकरदात्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या ४ कोटी ४८ लाख ७० हजार रुपयांपैकी १२१६ शेतकऱ्यांकडून १ कोटी १४ लाख १६ हजार रुपये वसूल करण्यात आले असून, आणखी साडेतीन कोटींची वसुली शिल्लक आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ही वसुली सध्या तरी ठप्प पडली आहे.
केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत ४ महिन्यात एक वेळा २ हजार रुपये याप्रमाणे वर्षातून तीन वेळा ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. या योजनेसाठी सुरुवातीला शेतकऱ्यांची नावे पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यानुसार अनुदान वाटप करण्यात आले. मात्र काही शेतकरी आयकर दाते असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यानंतर शासनाने या शेतकऱ्यांना अतिरिक्त दिलेली रक्कम परत घेण्याची मोहीम सुरू केली. तसेच शेतकऱ्यांना योजनेतून अपात्र ठरविले.
परभणी जिल्ह्यात आयकर भरणाऱ्या ४ हजार ९०० शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ कोटी ४८ लाख ७० हजार रुपये जमा झाले होते. महसूल प्रशासनाच्या वतीने या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांच्या खात्यावर जमा केलेली रक्कम परत जमा करण्याचे निर्देश दिले होते. मागील सहा महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यात अडथळे निर्माण होत आहेत.
२६ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील १२१६ शेतकऱ्यांकडून १ कोटी १४ लाख १६ हजार रुपये परत घेण्यात आले. उर्वरित ३ हजार ६८४ शेतकऱ्यांकडील ३ कोटी ३४ लाख ५० हजारांची रक्कम परत घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पीएम किसान योजनेत समाविष्ट झालेल्या आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जात आहे. जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ८६१ शेतकरी या योजनेत अपात्र ठरले होते. त्याखालोखाल परभणी तालुक्यातील ७६७ आणि सेलू तालुक्यातील ६३४ शेतकरी आयकर भरत असतानाही योजनेत समाविष्ट झाल्याची बाब निष्पन्न झाली. या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल केली जात आहे.
मानवत तालुक्यात सर्वाधिक अधिक वसुली
आयकरदात्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याच्या मोहिमेत मानवत तालुक्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील ४३३ शेतकऱ्यांनी ४० लाख सहा हजार रुपये अतिरिक्त जमा करण्यात आली होती. त्यापैकी २५८ शेतकऱ्यांनी २४ लाख ८० हजार रुपये जमा केले आहेत. तर पाथरी तालुक्यातील ४७५ शेतकऱ्यांनी ११ लाख ३२ हजार रुपये जमा केले आहेत.
तालुकानिहाय जमा झालेली रक्कम
गंगाखेड : ८,४४,०००
जिंतूर : १०,४०,०००
मानवत : २४,८०,०००
पालम : ६,५६,०००
परभणी : १३,०५,०००
पाथरी : ११,३२,०००
पूर्णा : ८,६०,०००
सेलू : १०,४४,०००
सोनपेठ : २०,५५,०००