पुन्हा कंत्राटी तत्त्वावरच कर्मचाऱ्यांची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:16 AM2021-03-14T04:16:48+5:302021-03-14T04:16:48+5:30

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता आरोग्य विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी ...

Recruitment of employees on contract basis only | पुन्हा कंत्राटी तत्त्वावरच कर्मचाऱ्यांची बोळवण

पुन्हा कंत्राटी तत्त्वावरच कर्मचाऱ्यांची बोळवण

Next

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता आरोग्य विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी कामावरून कमी केले होते. त्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिली जात असून शासनाच्या या भूमिकेबद्दल कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी मात्र नाराजी नोंदवली असून, कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी केली आहे.

मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर आरोग्य विभागाची पडती बाजू कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जीव धोक्यात घालून काम केले. मात्र या कामाची पावती देताना प्रशासनाने कर्मचाऱ्यांना घरी बसविले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला होता. मध्यंतरी संसर्ग कमी झाल्याने शासन-प्रशासन निश्चित होते; परंतु आता हा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केली आहे. मागील वर्षी कोरोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती दिली जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा केवळ गरजेनुसार वापर केला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत नियुक्ती द्यावी. त्यांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी आता या कर्मचाऱ्यांनी मधून केली जात आहे.

३६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू

येथील आरोग्य विभागातील ३६५ कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर केवळ ३० ते ४० कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्यात आले. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना घरी बसविले होते. आता पुन्हा या ३६५ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, काही कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती दिली जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना बोलाविले जाते आणि संसर्ग कमी झाल्यानंतर त्यांना काढून टाकणे हा प्रकार कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे.

कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत या कर्मचाऱ्यांना एनआरएचएम मधून नोकरी द्यावी तसेच आरोग्य सेवेत कायम करणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची शासनाने दखल घेतली पाहिजे.

डॉ. सचिन कसपटे

कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. अनेक वेळा जोखीमही पत्कारली. मात्र शासनाकडून कोणतेही संरक्षण या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. आता पुन्हा नियुक्त्या दिल्या जात आहेत. त्या कायमस्वरूपी द्याव्यात.

राजेश राठोड

कंत्राटी स्वरूपात असतानाही आम्ही भरपूर मेहनत घेतली. स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. मात्र शासनाने केलेल्या कामाची दखल घेतली नाही. आमचे काम पाहता आरोग्य सेवेत कायम करणे गरजेचे आहे ; परंतु या कामाची दखल घेतली जात नाही. तेव्हा यावेळेस तरी कायमस्वरूपी नियुक्ती आदेश मिळावेत.

कृष्णा माने

Web Title: Recruitment of employees on contract basis only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.