ऑक्सिजन बेडसाठी नातेवाइकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:16 AM2021-04-12T04:16:16+5:302021-04-12T04:16:16+5:30
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, बेडची संख्या घटली आहे. शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयातही पुरेसे बेड शिल्लक ...
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, बेडची संख्या घटली आहे. शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयातही पुरेसे बेड शिल्लक नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची मोठी धावपळ होत आहे. शनिवारी जिल्ह्यात २०५ बेड शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाने दिली; परंतु प्रत्यक्षात मात्र रुग्णांना अनेक तास ताटकळत थांबून हे उपलब्ध होत नसल्याचे दिवसभरात दिसून आले. येथील आयटीआय रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सुविधा आहे; परंतु रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाइकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
माहिती उपलब्ध करण्यास टाळाटाळ
जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी किती ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, त्यापैकी किती बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत, याबाबतची माहिती आरोग्य विभागाकडून दिली जात नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. आरोग्य विभागाने स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करून ही माहिती सर्वांसाठी खुली करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.