परभणीकरांना करवाढ नसल्याने दिलासा; मनपाचे ४८६.७९ कोटींचे अंदाजपत्रक सादर

By राजन मगरुळकर | Published: March 2, 2024 04:25 PM2024-03-02T16:25:55+5:302024-03-02T16:26:14+5:30

आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रशासकीय सभेत अर्थसंकल्पाला मान्यता दिली.

Relief to parabhani citizens as there is no tax increase; Municipal budget of 486.79 crores presented | परभणीकरांना करवाढ नसल्याने दिलासा; मनपाचे ४८६.७९ कोटींचे अंदाजपत्रक सादर

परभणीकरांना करवाढ नसल्याने दिलासा; मनपाचे ४८६.७९ कोटींचे अंदाजपत्रक सादर

परभणी : महापालिका प्रशासनाने सन २०२३-२४ चा सुधारित आणि सन २०२४-२५ चे मूळ अंदाजपत्रक शुक्रवारी सादर केले. यामध्ये मूळ अंदाजपत्रक ४८६.७९ कोटींचे तर सुधारित २०.८७ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर झाला आहे. 

आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रशासकीय सभेत अर्थसंकल्पाला मान्यता दिली. महसुली उत्पन्नाच्या स्रोतात मालमत्ता कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून कर आकारणी करणे, अनधिकृत नळजोडणी अधिकृत करून त्यांना पाणीपट्टी लागू करणे, विद्युत खांबावरील जाहिरातीपासून उत्पन्न, महापालिकेच्या मालमत्ता भाड्याने देणे यांचा या नवीन अर्थसंकल्प अंदाजपत्रकात समावेश आहे. अंदाजपत्रक सादरीकरणप्रसंगी अपर आयुक्त शुभम क्यातमवार, मुख्य लेखाधिकारी प्रवीण निर्मळ, नगर सचिव विकास रत्नपारखे, लेखापाल अमोल सोळंके, सहायक लेखापाल भगवान यादव, शहर अभियंता वसिम पठाण, कर अधीक्षक अल्केश देशमुख, यांत्रिकी अभियंता मिर्झा तन्वीर बेग उपस्थित होते. 

मागील आर्थिक वर्षात राबविलेले प्रकल्प, उपक्रमांमध्ये ६० खाटांचे रुग्णालय बांधकाम पूर्णत्वास नेणे, नवीन सात आरोग्यवर्धिनी केंद्र व एक आपला दवाखाना सुरू करणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक सुशोभिकरण, राजगोपालचारी उद्यानात १२० फूट उंच तिरंगा झेंडा उभारणे, यशोधन नगरात ज्येष्ठ नागरिक केंद्र सुरू करणे, महापालिकेच्या जागर उपक्रमांतर्गत महिलांना व्यवसाय व उद्योजकता प्रशिक्षण ही कामे केली.

यावर्षी राबविले जाणार महत्त्वपूर्ण प्रकल्प
शहराची विकास योजना, स्वच्छ भारत अभियान २.०, अमृत २.० अंतर्गत समांतर पाणीपुरवठा व भुयारी गटारी योजना, नवीन रस्ते बांधणी, पार्किंग सुविधा, नवीन भाजी मंडई बांधकाम, नवीन अग्निशमन केंद्र उभारणी व अग्निशमन वाहन खरेदी, डिजिटल शाळा, विविध खेळांसाठी भौतिक सुविधा निर्माण करणे, सुशोभिकरण कामांचा समावेश आहे. महिला भवन व बचत गटांकरिता दुकाने बांधणे, महिलांना उद्योजकता प्रशिक्षण, महिलांसाठी कायदेविषयक सल्ला केंद्र सुरू करणे, महाविद्यालयीन मुलींच्या उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती, महिलांकरिता आरोग्य शिबिर या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे.

Web Title: Relief to parabhani citizens as there is no tax increase; Municipal budget of 486.79 crores presented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.