रब्बीला दिलासा; खरिपातील कापूस, तूर पिकांचे नुकसान
By मारोती जुंबडे | Published: November 27, 2023 11:10 AM2023-11-27T11:10:15+5:302023-11-27T11:10:33+5:30
९०.६ मिलिमीटर पाऊस; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; दुधना नदीला आले पाणी
परभणी : रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व हरभरा पिकाला दिलासा मिळाला असला तरी खरीप हंगामातील कापूस व तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विभागाच्या ग्रामीण मौसम सेवा विभागाच्या वतीने जिल्ह्यासह मराठवाड्यात तीन दिवस मध्यम व जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तब्बल सव्वा तास हजेरी लावली. जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या नियंत्रण कक्षात ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
तर दुसरीकडे मानवत, परभणी व सेलू तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीला पाणी आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी वाहिल्याने खरीप हंगामातील कापूस व तूर पिकांचे ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील गहू, हरभरा व ज्वारी पिकांना दिलासा मिळाला असून खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी संधी आहे.
९०.६ मिलिमीटर पाऊस
रविवारी मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई भेडसावणार होती. मात्र ती आता काही अंशी कमी होणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवेच्या वतीने घेतलेल्या नोंदीनुसार रविवारी मध्यरात्री ९०.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
पावसाळ्यात नाही हो; हिवाळ्यात वाहिले ओढे
यंदा जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही ७३० मिलिमीटर असताना केवळ ५२३ मिलिमीटर पाऊस झाला. विशेष म्हणजे संपूर्ण पावसाळा खंड स्वरूपाचा पाऊस झाल्याने एकही पाऊस जोरदार झाला नाही त्यामुळे नदी, नाले, ओढे कोरडेच राहिले. परंतु २६ नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी, नाले, ओढ्यांना पाणी आले. त्यामुळे पावसाळ्यात नाही पण हिवाळ्यात ओढ्यांना पाणी वाहिल्याने आगामी पाणीटंचाईची समस्या काही अंशी दूर झाली आहे.
रब्बी हंगामातील पेरणी वाढणार
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने मिळालेल्या अहवालानुसार या विभागाने २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पेरणीचे नियोजन केले होते. त्यातील आतापर्यंत केवळ १ लाख ४५ हजार ८१५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. परंतु, ऑक्टोंबर महिन्यात पाऊस जिल्ह्यात बरसला नसल्याने जमिनीत ओलावा नव्हता. त्यामुळे ही पिके ऑक्सिजनवर होती. मात्र रविवारी झालेल्या जोरदार अवकळी पावसामुळे आता रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळाला असून पेरणीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
सोमवारी पहाटेपासून पुन्हा पाऊस
रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाले व ओढे खळखळून वाहिले. सोमवारी पहाटेपासूनच पुन्हा पावसाने हजेरी लावली. परभणी, जिंतूर, मानवत व गंगाखेड तालुक्यात सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता.